यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द गावातील विद्यार्थ्यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय व यवतमाळ आगार व्यवस्थापक कार्यालयात सामूहिक निवेदन देत सामूहिकपणे शाळा सोडण्याचा इशारा दिला. गावात रस्ते आणि एसटी बसची व्यवस्था नसल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि एस.टी. बससेवेच्या अभावामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सोडून घरी राहणेच योग्य आहे, असा संताप विद्यार्थ्यांनी नोंदवला.
गावाला जोडणारे सर्व पाचही रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असल्याने पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि पाण्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अवघड होते. शालेय पोषाख चिखलाने माखून खराब होतात. शिवाय गावातून एकही एस.टी. बस सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना कोठा, आष्टी, बाभूळगाव, कळंब या ठिकाणी शिक्षणासाठी दोन ते चार किलोमीटर पायी किंवा सायकलवरून जाऊन बस पकडावी लागते.
प्रवासादरम्यान सायकली पंचर होणे, कपडे खराब होणे आणि वेळ वाया जाणे यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. गावात पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. या विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त केली. रस्ते दुरुस्त न झाल्यास व बससेवा तातडीने सुरू न केल्यास गावातील सर्व विद्यार्थी सामूहिकरित्या शाळा सोडतील, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. नांदुरा खुर्द गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे तसेच गावातून थेट एस.टी. बसच्या फेर्या सुरू कराव्यात. आमचे शिक्षण बंद पडू नये, आमचे भविष्य अंधारात जाऊ नये, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.

या आंदोलनावेळी विद्यार्थी व गावकरी यांच्यासह नितीन महल्ले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अभिलाष खंडारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन महल्ले, सुधीर कडुकार, बबन बोंबले, चंदू अलोने, मारुती वांगाडे, अक्षय पालकर, ऋषिकेश मावळे, स्वप्निल मुळे, मंगला राऊत, माया शंभरकर, सुनीता वाघाडे, इंदू नेहारे, प्रा. पंढरी पाठे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रस्ते, शाळांची दुरवस्था
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. तर सध्या पावसाळ्यामुळे रस्तेही जागोजागी उखडले असून, खराब झाले आहेत. अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याने, पावसाळ्यात हे रस्ते वाहून गेले आहेत. अनेक गावात रस्त्या अभावी एसटी बस जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू आहे. नांदुरा येथील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला, मात्र इतरही ठिकाणी अशीच बिकट अवस्था आहे.