नागपूर : बँकेतील सुरक्षित नोकरी, मोठा पगार, अधिकारी पद यांचा त्याग करून फक्त क्रिकेटसाठी झगडणाऱ्या नमा खोब्रागडे यांचं नाव आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) च्या अधिकृत मॅच रेफरी यादीत झळकणार आहे.
नमा खोब्रागडे यांची ही यशोगाथा केवळ क्रिकेटची नाही, तर हजारो तरुणांसाठी स्वप्न, जिद्द आणि धैर्य यांचं प्रतीक आहे. सध्याच्या स्पर्धेच्या आणि अस्थिरतेच्या काळात, सुरक्षिततेला मागे टाकून आपलं खरं पॅशन निवडणं आणि त्यात यश मिळवणं हीच खऱ्या अर्थाने प्रेरणा आहे.
नमा यांनी १७ ते १९ जून २०२५ दरम्यान अहमदाबाद येथे पार पडलेल्या बीसीसीआयच्या मॅच रेफरी परीक्षेत देशभरातून तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले. ही परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक होती. यात एकूण ७५ उमेदवार सहभागी झाले होते, त्यापैकी फक्त दहा जणांची अंतिम यादीत निवड झाली. विशेष म्हणजे या निवडीत विदर्भातील दोन महिला – सोनिया (दुसरा क्रमांक) आणि नमा (तिसरा क्रमांक) यांचा समावेश झाला.
बालपणापासून क्रिकेटची ओढ
नमा खोब्रागडे यांना क्रिकेटची आवड लहानपणापासूनच होती. इतर मुली बाहुल्या खेळत असताना, नमा टीव्हीवर सचिन, द्रविड आणि झुलन गोस्वामी यांचे सामने पाहत होती. २००२ पासून त्यांनी गल्लीत क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि हीच आवड हळूहळू ‘पॅशन’ झाली. त्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन व वेस्ट झोनकडून खेळल्या, तसेच नागपूर विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. मात्र, २०१७ मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी बँक ऑफ बडोदा मध्ये पीओ म्हणून प्रवेश घेतला आणि काही वर्षांतच त्या सिनियर मॅनेजर पदावर पोहोचल्या.
मोठा निर्णय, नव्या प्रवासाची सुरुवात
एकीकडे स्थिर, प्रतिष्ठित व आर्थिकदृष्ट्या सुरक्षित नोकरी, आणि दुसरीकडे स्वप्न. २०२४ मध्ये नमा यांनी मोठा निर्णय घेतला, नोकरीचा राजीनामा आणि पुन्हा एकदा क्रिकेट क्षेत्रात प्रवेश केला. ही परीक्षा सहज नव्हती. देशभरातील निवडक क्रिकेटपटूंमध्ये ती सहभागी झाली. अभ्यास, तयारी आणि मानसिक ताकद यांच्या जोरावर नमा यांनी आपलं नाव अंतिम यादीत कोरलं. नमा ही माजी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी इ. झेड. खोब्रागडे व संविधान फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा खोब्रागडे यांची कन्या आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी, शिस्त, आणि ध्येयासाठी समर्पण हे गुण तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहेत.