चंद्रपूर: अंबोरे कुटुंबाचा भंगार विक्रीचा व्यवसाय. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. अशात २२ वर्षीय मुलगा आजारी पडला. त्याच्या हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झालेत. हातात पैसा नाही आणि कुटुंबाचे भविष्य असलेला तरुणही आजारी, अशा विवंचनेत सापडलेल्या पालकांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेतली. मुनगंटीवार यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि तरुणावर मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. तरुणसाठी देवदूत ठरलेल्या ना. मुनगंटीवार यांचे आभार मानताना अंबोरे कुटुंबीयांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या.

गोंडपिपरी येथे राहणारा तरुण साहेबराव अंबोरे हा मूळचा नांदेड जिल्ह्याचा रहिवासी. गेल्या १६ वर्षांपासून अंबोरे कुटुंब गोंडपिपरी येथे वास्तव्यास आहे. तरुणाला बालपणापासूनच हृदयाचा आजार जडला. २००६ मध्ये त्याचावर शस्त्रक्रियासुद्धा झाली. परंतु पुढील औषधोपचाराचा खर्च साहेबरावच्या आईवडिलांना झेपत नव्हता. अशात त्याची प्रकृती खालावत गेली व हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झाले. त्याच्या आईवडिलांनी माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांच्याशी संपर्क साधला. तरुणाला वाचवण्यासाठी एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजे सुधीर मुनगंटीवार, याची पूर्ण जाणीव बोडलावार यांना होती. त्यांनी तरुणाच्या आईवडिलांना तातडीने मुनगंटीवार यांच्याकडे नेले.

हेही वाचा… “आली रे आली आता थंडी आली…” राज्यात थंडीला सुरुवात, हवामान खाते म्हणते…

अंबोरे कुटुंबीयांची कैफियत ऐकून मुनगंटीवार यांनी मदतीचा हात दिला. तरुणच्या आईवडिलांचे थरथरणारे हात हातात घेऊन आपण पूर्ण शक्तीने मदत करू, असा शब्द त्यांनी दिला. त्यांनी तत्काळ आरोग्य सहाय्यक सागर खडसे यांना यासंदर्भात मदत करण्याच्या सूचनाही दिल्या.

जीवन-मरणाचा संघर्ष

मुनगंटीवार यांनी तरुणाच्या उपचारासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली व त्याला मुंबईला रवाना केले. अलीकडेच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉ. सुरेश जोशी यांनी तरुणच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यासाठी जवळपास १९ लाख रुपयांचा खर्च आला. शस्त्रक्रियेनंतर तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जीवन-मरणाशी संघर्ष करीत असलेल्या आपल्या लेकराला स्वस्थ पाहून त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पाणावलेल्या डोळ्यांनीच त्यांनी देवदुतासारखे धावून आलेल्या मुनगंटीवार यांचे आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५ बालकांवर मुंबईत शस्त्रक्रिया

स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑक्टोबर रोजी श्री माता कन्यका सेवा संस्था व मुंबई येथील फोर्टीज रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथील वनअकादमीमध्ये मोफत हृदयविकार तपासणी शिबीर घेण्यात आले. तपासणीदरम्यान ६४ बालकांना हृदयविकारासंबंधी आजार आढळून आले. पहिल्या टप्प्यात यातील २५ बालकांवर मुंबई येथील फोर्टीज रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.