चंद्रपूर : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून नवेगाव येथील शेतकरी देवराव यादव दिवसे (५९) यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.राजुरा तालुक्यातील नवेगाव येथील देवराव दिवसे यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना तीन मुली आहे. पत्नी गेल्यानंतर त्यांनी मुलींचे संगोपन व्यवस्थित केले.

त्यांचेकडे पाच एकर शेती असून कष्ट करून देवराव कुटुंबाचा गाडा चालवीत होते. परंतु मागील तीन वर्षापासून सततच्या नापिकीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. अखेर कर्जामुळे त्रस्त होऊन बुधवारी रात्री दिवसे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार त्यांच्यावर बँक ऑफ इंडिया, शाखा विरुर चे पिक कर्ज एक लाख वीस हजार रुपये असल्याची माहिती मिळाली. मृत शेतकर्‍याच्या खिशात एक सुसाईड नोट मिळाली असून सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मी स्वतः आत्महत्या करित आहे, असे त्यात लिहून ठेवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल, पोलीस हवालदार देवाजी टेकाम, पोलीस शिपाई अशोक मडावी करीत आहेत.