चंद्रपूर : ‘बियर शॉपी’ परवाना लाच प्रकरणात अटकेत असलेले उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी पाटील यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत १७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

गोदावरी बियर बार अँड रेस्टॉरंट मध्ये बियर शॉपी सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अधीक्षक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात दुय्यम निरीक्षक खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ या दोघांवर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर पाटील यांच्या संपत्तीची चौकशी सुरू झाली आहे.

हेही वाचा >>>जागतिक उच्च रक्तदाब दिन विशेष : ४० टक्के रुग्णांना उच्च रक्तदाबाची समस्या

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार सुधाकर अडबाले यांनी या प्रकरणी एसआयटी चोकशीची मागणी केली आहे. पालकमंत्री व आमदार यांच्या तक्रारीनंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.  दरम्यान अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्याने  शासनाने पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

तर चिमूर येथील एका प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) अधिकची माहिती हवी असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. लाच प्रकरण तथा उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी वाईन शॉप, बियर बार अँड रेस्टॉरंट, देशी दारू दुकान तथा बियर शॉपी यांच्याकडून दर महिन्याला सव्वा कोटी पेक्षा अधिकची वसुली करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आणखी काही अधिकाऱ्यांची चोकशी होणार आहे.

हेही वाचा >>>नागपूर : कीटकनाशक ‘सेल्फोस’ प्राशन केलेल्या तरुणाला वाचवण्यात यश

मोबाईल संभाषण प्रयोगशाळेत तपासणीसाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक खरोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ या तिघांचे मोबाईलवर संभाषण झाले होते. या संभाषणाची ध्वनीफित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. तसेच पाटील यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानाची प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा तपासणी केली आहे. कोल्हापूर येथील निवासस्थानाची तपासणी केली असता तिथे सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, महागड्या चारचाकी गाड्या, जमिनीची कागदपत्रे मिळाली आहेत. पाटील यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिकची संपत्ती आहे का याचीही चौकशी सुरू झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात ७५० पेक्षा अधिक बियर बार अँड रेस्टॉरंट, ९ वाईन शॉप, देशी दारू दुकान, बियर शॉपीला परवानगी दिली आहे. अधीक्षक पाटील गेल्या दोन वर्षापासून येथे अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. पाटील यांच्या कार्यकाळात किती परवाने मंजूर केले याचीही स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे. पाटील यांनी परवाना मंजुरीतून ६४ कोटी पेक्षा अधिकची रक्कम गोळा केल्याची चर्चा येथे आहे. या गोळा करण्यात आलेल्या पैशात मंत्रालयापासून नागपूर व चंद्रपूर येथील वाटा असल्याचेही सांगण्यात येत आहे.