चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जखमी वाघिणीच्या हालचालीवर ‘कॅमेरा ट्रॅप’, प्राथमिक बचाव दल (पीआरटी) व वनकर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे नियमित लक्ष ठेवण्यात येत आहे. ही वाघीण व तिचे दोन बछडे सुरक्षित असून वाघिणीने रानडुकराची शिकार केल्याची एक चित्रफीत समोर आली आहे. याचबरोबर, तिच्या पायाची दुखापत कमी झाल्याचे ताडोबा व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर विभागातील शिवणी वनपरिक्षेत्र, नियतक्षेत्र पांगडी -३ मधील हिरडीनाला परिसरातील ‘टी-४’ नामक वाघिणीच्या मागील डाव्या पायाला जखम झाल्याचे १८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आले होते.

ही वाघीण १४ ते १५ वर्षे वयाची असून तिच्यासोबत तिचे १४ ते १५ महिन्यांचे दोन बछडे (१ नर व १ मादी) आहेत. २४ नोव्हेंबर रोजी या वाघिणीने पाळीव गायीची शिकार केली. या शिकारीच्या ठिकाणचे वाघिणीचे छायाचित्र प्राप्त झाले आहे. वाघिणीचा वावर पांगडी बफर क्षेत्र व कोअर क्षेत्रात नियमितरित्या दिसून येत आहे. शिवणी परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, प्राथमिक बचाव दल व इतर क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने या वाघिणीचा नियमित व सतत मागोवा घेतला जात आहे.

हेही वाचा: भाजप आमदार होळींची स्वपक्षीयांविरोधात पोलीसांत तक्रार; ‘मेक इन गडचिरोली’प्रकरणी अंतर्गत वाद चव्हाट्यावर

२७ व २९ नोव्हेंबरपर्यंत टी-चार वाघीण कुकडहेटी व पांगडी गावालगतच्या संरक्षित क्षेत्रात फिरताना दिसून आली. ४ डिसेंबर रोजी वाघिणीने रानडुकराची शिकार केली आणि यावेळी तिचे दोन्ही बछडेही तिच्यासोबत दिसून आले आहेत. सद्यस्थितीत व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाद्वारे वाघिणीस जेरबंद करून चिकित्सा करण्याची आवश्यकता नाही. वाघिणीच्या हालचालींवर कॅमेरा ट्रॅप, प्राथमिक बचाव दल व वनकर्मचारी नियमित लक्ष ठेवून आहेत. आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकळ यांनी कळवले आहे.