चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बफर झोनमध्ये आठवडयातून एक दिवस फक्त बुधवारी स्थानिकांना पाच हजार रुपयांत जंगल सफारीसाठी एक जिप्सी उपलब्ध करून दिली जाणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या आंदोलनानंतर ताडोबा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आंदोलनानंतर कोर झोनमध्ये स्थानिकांना कुठलीही सुट दिलेली नाही.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी १ ऑक्टोंबर रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सहाही प्रवेशव्दारावर आंदोलन केले होते. तेव्हा ताडोबा व्यवस्थापनाने खासदार धानोरकर यांच्याशी चर्चा करतांना स्थानिकांना शुल्क कमी करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार स्थानिक नागरिकांच्या हितासाठी प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून एक दिवस एका बफर गेटवर एका सत्रासाठी काही जिप्सी राखीव ठेवण्यासंदर्भातील प्रस्ताव कार्यकारी समितीकडे मंजुरीस्तव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर ३ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यकारी समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

बफर विभागातील आगरझरी प्रवेशव्दार येथे दर बुधवारी सकाळच्या सत्रासाठी सर्व जिप्सी सफारी वाहने (म्हणजेच एकूण ६ जिप्सी) केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच यामध्ये एका जिप्सीसाठी (६ सीटर) ५००० रु. एवढे शुल्क आकारले जाईल, असा निर्णय कार्यकारी समितीद्वारे घेण्यात आलेला आहे. सदरील जिप्सी बुकिंग हे उपसंचालक (कोर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ,चंद्रपूर कार्यालयातील क्रुझर बुकिंग काउंटर येथेच सफरीच्या ७ दिवस आधीपासून एकदिवस आधीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करू शकतात. हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून प्रतिसाद अनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, तसेच याची अंमलबजावणी बुधवार ८ ऑक्टोबर २०२५ पासून करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडून स्थानिकांच्या सोईसाठी ९ सिटर क्रुझर सुरु असुन मोहरली प्रवेशव्दाराकरीता ४ क्रुझर व कोलारा प्रवेशव्दाराकरीता ३ क्रुझर कार्यरत आहेत. तसेच प्रती दिवस १४ क्रुझरव्दारे सकाळ व दुपार फेरीकरीता एकुण १२६ पर्यटकांना प्रवेश देता येतो. क्रुझर सफारी सेवा शुल्क केवळ रु. ७२०/- एवढे असुन त्यात कॅमेरा शुल्कामध्ये १०० टक्के सुट देण्यात आलेली आहे अशी माहिती ताडोबा कोरचे उपसंचालक आनंद रेड्डी यांनी दिली. विशेष म्हणजे स्थानिकांना बफर झोनमध्ये आठवड्यातून एक दिवस ही सवलत आहे. कोर क्षेत्रात कुठल्याही प्रकारची सुट दिलेली नाही असेही ताडोबा व्यवस्थापनाने कळविले आहे.