लोकसत्ता टीम

चंद्रपूर: घरभाड्याच्या जुन्या थकीत रक्कमेवरून झालेल्या वादातून भाडेकरूने घरमालकीणची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरातील चोरखिडकी परिसरात घडली. सुवर्णा सकदेव (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवत आरोपी भाडेकरूस अटक केली आहे. अनुप सदानंद कोहपरे (२५) असे आरोपीचे नाव आहे. तो गोंडपिपरी तालुक्यातील वडकुली येथील रहिवासी आहे.

अनुप कोहपरे हा मागील काही वर्षांपासून चंद्रपुरात नोकरीनिमित्त भाड्याच्या खोलीत राहत होता. तो एका हॉटेलमध्ये कामाला आहे. चोरखिडकी येथील सुवर्णा सकदेव यांच्या घरी तो भाड्याने राहत होता. मागील काही महिन्यांचे घरभाडे थकीत होते. तेव्हा सुवर्णा यांनी त्यास हटकले असता तो रूम सोडून निघून गेला होता. पुन्हा काही दिवसांनी परत आला. त्यानंतर तो पुन्हा राहू लागला. दरम्यान सुवर्णा सकदेव हिने थकीत भाडे वसुलीसाठी अनुपकडे तगादा लावला. त्यावेळी त्याला प्रचंड राग आला आणि तेव्हापासून त्याच्या मनात तिचा काटा काढण्याचा बेत होता. मंगळवारी १६ मे रोजी दोघात भांडण होऊन धक्काबुकी झाल्याने सुवर्णा खाली पडल्या. रक्तस्त्राव झाल्याने जखमी झाल्या. मात्र अनुपचा राग शांत झाला नव्हता. त्याने सुवर्णा खाली पडली असताना तिचा गळा दाबून खून केला. नागरिक गोळा झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

हेही वाचा… छायाचित्रणासाठी उत्सुक बिबट्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, तोपर्यंत आरोपी अनुप हा ‘सीसीटीव्ही’चा ‘डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर’ घेऊन पसार झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंडपिपरीतील वडकुली गावात जाऊन अनुप कोहपरेला अटक केली. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या पतीचा महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.