अमरावती : शिवसेना ठाकरे गटाला अमरावती जिल्ह्यात लागलेली गळती थांबण्याची चिन्हे दिसत नसून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुनील खराटे यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
विरोधी पक्षात असताना माझ्या आवाजाला दुर्लक्ष करण्यात आले. मात्र भाजपमध्ये सामील झाल्यानंतर या विषयावर ठोस पावले उचलण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. भाजप प्रवेशाच्या वेळी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर नेते उपस्थित होते.
भाजपचे स्थिर नेतृत्व, विकासाभिमूख धोरणे आणि राष्ट्रप्रेमाची विचारसरणी यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे सुनील खराटे यांनी सांगितले. पक्षांतर करताना सुनील खराटे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका करण्याचे टाळले.
सुनील खराटे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कार्यक्षमता हीच देशाच्या विकासाची खरी दिशा आहे. मला राष्ट्रहितासाठी व्यापक पातळीवर काम करण्याची इच्छा आहे आणि ती संधी मला भारतीय जनता पक्षातच मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
भाजपचा अजेंडा हा देशाच्या सर्वांगीण विकासावर केंद्रीत आहे, असे सांगून बांगलादेशी नागरिकांच्या खोट्या कागदपत्रांद्वारे अमरावती शहरातील वास्तव्याच्या प्रश्नावर सुनील खराटे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. राष्ट्रहितासाठी स्पष्ट दिशा आणि निर्णयक्षम नेतृत्व आवश्यक आहे, जे आज भाजपमध्ये उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.
सरकार आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करणाऱ्या धोरणामुळे मतदारांशी थेट संवाद साधता येतो आणि लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर कार्यवाही करता येते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, मी भारतीय जनता पक्षात सामील होत असून, माझे कार्य हे निःस्वार्थ आणि समाजहितासाठीच राहील. अमरावती शहर, महाराष्ट्र राज्य, आणि देशासाठी मी सतत कार्यरत राहील, असे सुनील खराटे यांनी सांगितले. सुनील खराटे यांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी काही दिवसांपुर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.