लोकसत्ता टीम

यवतमाळ : जिल्हा परिषदेतल्या कोणत्याही निर्णयाचा चेंडू सीईओंच्याच कोर्टात असतो. कर्मचाऱ्यांनी फलंदाजीच्या कितीही ट्रिक आत्मसात केलेल्या असतील, तरी सीईओंचा कोणता चेंडू त्यांची ‘विकेट’ काढेल हे सांगता येत नाही. सीईओंनी ‘खिलाडू’ वृत्तीने घेतलेल्या अशाच विकेटची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. अर्थात ही विकेट कामकाजातील हायगयीची नव्हे तर क्रिकेटच्या मैदानावरील कसरतींची आहे.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी उद्घाटनाचा सामना झेडपी मुख्यालय आणि महागाव पंचायत समिती असा रंगला होता. मुख्यालयाच्या चमूमध्ये गोलंदाजीची धुरा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सांभाळली. महागावच्या फलंदाज कर्मचाऱ्यांनी सुरुवात उत्तम केली, मात्र नंतर सीईओ घोष यांच्या एकेका चेंडूने त्यांची त्रिफळा उडवायला सुरुवात केली. चक्क पाच फलंदाज सीईओ घोष यांनी बाद केल्यामुळे महागावचा संघ पहिल्याच सामन्यात गारद होऊन परतला. या सामन्यात मुख्यालयाचा संघ विजयी झाला. या सामन्याचे सामनावीर सीईओ डॉ. मैनाक घोष ठरले.

आणखी वाचा-हरविलेल्या ८५८ मुलांची ‘घरवापसी’! कौटुंबिक कलहाने…

शुक्रवारी मुख्यालय (अ) विरुद्ध महागाव असा सामना झाला. यात मुख्यालय संघ विजयी ठरला आणि सीईओ डॉ. मैनाक घोष सामनावीर ठरले. दिग्रस विरुद्ध कळंब संघात झालेल्या सामन्यात दिग्रस संघ विजयी ठरला तर स्वप्नील रहाटे सामनावीर ठरले. मारेगाव विरुद्ध बाभूळगाव संघात मारेगाव संघाने बाजी मारली.अनिल मडावी हे सामनावीर ठरले. यवतमाळ विरुद्ध पांढरकवडा सामन्यात यवतमाळ संघ विजयी झाला तर देवानंद सोयाम हे सामनावीर ठरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात कोण हरले कोण जिंकले, यापेक्षा एक आयएएस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत समरस होऊन खिलाडू वृत्तीने खेळला हे चित्र पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले आणि चर्चेतही राहिले.