नागपूर: संविधान आपल्या देशाचा मेंदू आहे. देशातील नागरिकांवर त्याचे नियंत्रण आहे. परंतु आपला हा मेंदूच ‘हॅक’ झाला आहे. त्यामुळे येथील नागरिक दुसऱ्याच्या विचाराने चालताना दिसत आहेत, असे मत पद्माश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले. संविधान फाऊंडेशन आणि ई. झेड. फाऊंडेशनतर्फे ‘आपले संविधान’ या पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीचे प्रकाशन आणि ‘संविधान जागरुकतेची आवश्यकता’ या विषयावर शंकरनगर येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात शनिवारी चर्चासत्र पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक विनायक महामुनी, संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे उपस्थित होते.
डॉ. मेश्राम पुढे म्हणाले, संविधान घरोघरी पोहोचवण्याचा उपक्रम उत्तम आहे. परंतु संविधानाच्या तत्वानुसार आचरण करणे, त्याचे पालन करणे आवश्यक आहे. जात, धर्म घरात पाळायला हवे आणि घराबाहेर पडल्यावर भारतीय संविधानाप्रमाणे आचरण करायला हवे. पण, संविधानारुपी मेंदू ‘हॅक’ झाल्याने असे घडताना दिसत नाही. जात, धर्म, राजकारण याबाबत लोक दुसऱ्यांच्या विचाराने चालताना दिसतात. ही देशाची मोठी समस्या आहे, असेही ते म्हणाले.
कर्तव्याप्रमाणे जबाबदारीची देखील जाणिव होणे गरजेचे आहे. मी संविधानामुळेच जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचलो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. विनायक महामुनी म्हणाले, संविधानाने आपली बाजू मांडण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे खोब्रागडे यांनी आपली बाजू मांडून संविधान नागपूर जिल्ह्यातून देशपातळीवर पोहोचवला. आपले संविधान अत्यंत तर्कावर आधारित आहे. संविधान नसल्यास अनागोंदी माजेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नागपूर शहराने संविधान दिवस देशभर पाळण्याबद्दल देशाला दिशा दिली. पुढील काळात संविधान चौकात २६ नोव्हेंबरला राष्ट्रध्वज फडवण्यात येईल, अशी माहिती ई. झेड. खोब्रागडे यांनी दिली. तसेच विविध विद्यापीठात सेंटर फॉर कन्स्टीस्टुशनल स्टडीज सुरू करण्यात यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. संचालन रेखा खोब्रागडे यांनी केले.