नागपूर : राज्यातीन मोसमी पावसाची वाटचाल अजूनही सुरूच असून भारतीय हवामान खात्याने मूसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरावर २४ सप्टेंबरला एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. २८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोसमी पावसाने यावर्षी वेळेच्या आतच प्रवेश केला. तर परतीची वाट देखील आधीच धरली आहे. मोसमी पाऊस यावेळी आपल्या सरासरी वेळेच्या तीन दिवस आधी म्हणजेच १४ सप्टेंबरला परतीच्या प्रवासावर निघाला. मात्र, परतीचा प्रवास सलग असण्याऐवजी अडखळत सुरू आहे. पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरातच्या काही भागातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे, पण त्याचा प्रवास अडखळत सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा कोरड्या दुष्काळासाठी ओळखला जात होता. यावर्षी मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे. संपूर्ण राज्यातच पावसाने जोर धरला आहे. त्याच्या परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर पावसाने आणखी वेग धरला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने आता पुन्हा मुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मोसमी पाऊस या आठवड्यात पुन्हा सक्रीय होणार आहे. त्यामुळे येत्या ३० सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून हा पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस अपेक्षित आहे. हा पाऊस प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. तर कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २६ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.

२७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.