नागपूर : राज्यातील पावसाळी वातावरणाने मोसमी पाऊस यंदा लवकरच दाखल होईल याची नांदी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस हजेरी लावत आहे. आतातर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. पश्चिम बंगालपासून झारखंड, विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमा, तसेच मराठवाडा, कर्नाटक ते केरळ या संपूर्ण पट्टयात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून, त्यामुळे राज्यभर पूर्वमोसमी पावसाचे सावट आहे.
हवामानात काय बदल ?
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गारपीटीसह पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पीकांचे नुकसान झाले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्याने दिलासा दिला आहे. यंदा उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाली. मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या, तर एप्रिल महिन्यात तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले. मात्र, अधूनमधून पाऊस डोकावत होता. आताही हवामानात मोठा बदल झाला आहे.
पावसाची शक्यता कुठे?
पुणे, मुंबई, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने या जिल्ह्यांमध्ये “ऑरेंज अलर्ट” जाहीर केला आहे. दुसरीकडे नाशिक आणि सातारा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर अहिल्यानगर आणि पुण्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड यासह विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना “येलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे.
तापमानाची स्थिती काय?
दरम्यान, मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्याने राज्यातील बहुतांश भागात वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. काही भागात तापमानाचा पारा वाढला आहे. ब्रह्मपुरीत ४२.१ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ४१.२ अंश सेल्सिअस तर वर्धा येथे ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे राज्यातील तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअस वर आला होता. परवापासून तापमानात अचानक वाढ झाली. आता पुन्हा पावसाळी वातावरण तयार झाले आहे. पुणे आणि मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात चार दिवस “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे.