लोकसत्ता टीम

नागपूर: मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून कुटुंबियांच्या विरोधात प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन पत्नीच्या वडिलासह तिघांनी युवकावर प्राणघातक हल्ला करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मोहम्मद सलालुद्दिन कामिल उर्फ मोहम्मद परवेज कुरैशी (२७, गुलशननगर, कळमना) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याने दोन वर्षांअगोदर आलम अली उर्फ हसन अन्सारी (४४, वनदेवीनगर) याच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. याला आलमचा विरोध होता, मात्र त्याचे न ऐकता हा विवाह झाला होता.

हेही वाचा… नागपूर : वंदे भारत एक्सप्रेस आजपासून पुन्हा सुरू, १६ ऐवजी ८ डबे राहणार

तेव्हापासून त्याच्या मनात जावयाविरोधात राग होता. सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास कामिल हा त्याचा मामेभाऊ फैजल शफी कुरैशी (३०, वांजरा) याच्यासोबत वनदेवीनगर चौक येथून जात होता. त्यावेळी आलम त्याचे साथीदार सिकंदर अली उर्फ हसन अन्सारी (२१, वनदेवीनगर), सुलतान अन्सारी (वनदेवीनगर) व एका अल्पवयीन मुलासह होता.

हेही वाचा… वर्धा : ‘निधी वळता करा अन्यथा राजीनामा देतो’, भाजपा आमदार दादाराव केचे यांचे पालकमंत्री फडणवीस यांना खरमरीत पत्र

त्यांनी दोन्ही भावांना थांबविले व शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर अचानक कामिलवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. फैजलने आपल्या भावाला वाचवायचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्यावरदेखील चाकूने वार करण्यात आले. घटनास्थळी गोंधळ ऐकून लोक एकत्र झाले व सर्व आरोपी तेथून फरार झाले. दोन्ही भाऊ जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झाले होते. त्यांना मेयो इस्पितळात नेण्यात आले. कामिलच्या तक्रारीनंतर यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी सासरा आलम याच्यासह सिकंदर अली उर्फ हसन अन्सारी याला अटक केली आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.