राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : फुटाळा तलावावर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा संगीत कारंजी प्रकल्प उभारण्यात आला. परंतु, या कारज्यांच्या केबलला शेवाळ आणि किड्यांनी वेढा घातला आहे. इतरही काही उपकरणे लोकार्पणाआधीच नादुरुस्त झाली आहेत.

नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी तब्बल ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मार्चमध्ये सी-२० परिषदेदरम्यान शेवटची चाचणी घेण्यात आली. पण, अद्याप लोकार्पणाचा मुहूर्त काही सापडलेला नाही. आता तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरूनही कारज्यांना शेवाळ आणि किड्यांना वेढले आहे. केबल कुरतडल्याने हे कारंजे नादुरुस्त झाले आहेत. या प्रकल्पाचे कंत्राटदार असलेल्या खळतकर कन्स्ट्रक्शन कंपनीने (केसीसी) आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून केबलची तपासणी केली व विशिष्ट प्रकारची केबल वापरण्याची सूचना केली.

आणखी वाचा-ऑगस्टमध्येही पावसाने केला भ्रमनिरास, सात सप्टेंबरनंतर जोर धरणार?

तलावात पाण्याखाली टाकलेले वायर, पंप आणि इतर उपकरणांना शेवाळाने झाकले आहे. यामुळे यंत्रणा नीट काम करत नाही. आजूबाजूच्या भागातून सांडपाणी तलावात येते. त्यामुळे शेवाळ वाढतात. या कारंजांसाठी ५०० हून अधिक वायर वापरले असून, प्रत्येक वायर हाताने स्वच्छ करता येणे शक्य नाही. त्यामुळे आता विशिष्ट प्रकारचे वायर तयार करण्यात येणार आहे.

न्यायालयात याचिका

फुटाळा तलावाचा पाणथळ क्षेत्रात समावेश होतो. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, या क्षेत्रात पक्के बांधकाम केले जाऊ शकत नाही. असे असूनही फुटाळा येथे ‘म्युझिकल फाउंटेन’ तयार करण्यात आले, असा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात करण्यात दाखल आली आहे.

आणखी वाचा-Video: एका हातात छत्री दुसऱ्या हातात एसटी बसचे ‘स्टिअरिंग’!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोव्हेंबरमध्ये लोकार्पण

“मल्टीफ्लेक्स, फुडपार्क आणि फिरते उपाहारगृह तसेच वाहनतळ असलेल्या इमारतीचे काम महामेट्रो करीत आहे. तरंगता मंच उभारण्यात येत आहे. कारंजासाठी विशिष्ट प्रकारचे वायर मागवण्यात येणार आहेत. येत्या नोव्हेंबरपर्यंत संगीत कारंजांचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे.” -मनोजकुमार सूर्यवंशी, महानगर आयुक्त, एनएमआरडीए.