लोकसत्ता टीम
वर्धा : भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची हिंगणघाट येथे सभा झाली. यावेळी त्यांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मला सूचित करून या, असे आवाहन करीत टाळ्या घेतल्या.
ते म्हणाले की स्वातंत्र्यानंतर हे पहिलीच अशी निवडणूक आहे जिचा निकाल मतदानापूर्वीच देशाला कळला आहे. येणार तर मोदीच, असे ठरले आहे. भारत देशाला जागतिक शक्ती करण्याचा विडा मोदींनी उचलला आहे. देश विकासाच्या एक नव्या पर्वावार उभा आहे. मोफत राशन, आयुष्यमान योजना, शेतकऱ्यांना अन्नदाता सन्मान,उज्ज्वल भारत योजना, विश्वकर्मा योजना, स्टार्ट अप आणि अन्य योजणांचा लाभ कोट्यावधी जनता घेत आहे. गरिबांनाच घरकुल मिळाले नाही तर रामलल्लाही भव्य निवासस्थान मिळाले. हे सर्व मोदींमुळे झाले. आज देशात उत्तर प्रदेश सुरक्षित आहे. येथे संतांची हत्या होते. मात्र आमच्या राज्यात जर अशी घटना घडली तर ‘उल्टा टांग देते.’
आणखी वाचा-यवतमाळात शिवसेना विरूद्ध शिवसेनाच! १७ उमेदवार रिंगणात
ते पुढए म्हणाले, सात वर्षात संचारबंदी लागली नाही. एकाही दंगल झाली नाही. सर्व यात्रा शांततेत निघतात. पाचशे वर्षानंतर रामलल्ला होळी खेळले. तसेच सीमेवर आता गडबड दिसत नाही. फटाका फुटला तरी पाकिस्तान म्हणते आम्ही फोडला नाही. तीन तलाक प्रथा बंद झाली. काँग्रेस हे करू शकली नाही. मोदींनी केले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले. शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य ते हेच आहे. आता चारसो पारचे लक्ष्य पूर्ण करायचे असेल तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून द्या. इथे रामदास तडस यांनी खूप कामे केली आहेत. म्हणून त्यांना निवडून द्या. प्रत्येकाने स्वतःला रामदास समजून प्रचार करा. घरोघरी जा. निवडून आणा. असे आवाहन योगी यांनी केले.
सुबोध मोहितेंची पत्रकारांवर टीका
मुख्यमंत्री योगी येण्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुबोध मोहिते यांनी केलेल्या वक्तव्याने गोंधळ उडाला. मेडिकल कॉलेज संदर्भात बोलताना ते म्हणाले की, पत्रकार आमदारांकडून पाकिटे घेऊन बातम्या छापतात. त्यामुळे उपस्थित पत्रकार संतापले. पाकिटे घेऊन बातम्या छापणाऱ्या पत्रकारांची नावे सांगा, असा जाहीर संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच निषेध करीत सर्व पत्रकार निघून गेले. दरम्यान, मोहिते यांनी पत्रकारांची माफी मागितली.