भंडारा : विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात केंद्र शासन पुरस्कृत आयसीटी योजनेअंतर्गत सन २००७-०८ या वर्षापासून महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या सुमारे ८ हजार संगणक प्रयोगशाळा संगणक शिक्षकाअभावी आजही धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित असून संगणक प्रयोगशाळा शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत.

केंद्र पुरस्कृत आयसीटी योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी सन २००७/०८ पासून तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील सुमारे ८ हजार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या. त्यामध्ये विविध एजन्सी मार्फत मानधनावर ८ हजार संगणक शिक्षकांची नियुक्ती पाच वर्षासाठी करण्यात आली.२०१९ मध्ये करार संपल्यानंतर संगणक शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित झाले असून आता शिक्षक संघटना, विद्यार्थी व शिक्षण संचालनालय या तिघांनी मिळून आयसीटी शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीची मागणी तीव्र केली आहे.

भंडारा जिल्ह्यात १५७ संगणक प्रयोगशाळा

केंद्र शासनाच्या आयसीटी योजने अंतर्गत भंडारा जिल्ह्यात टप्पा १ मध्ये १८,टप्पा २ मध्ये ४४ व टप्पा ३ मध्ये ९५ अशा एकूण १५७ संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या होत्या.त्यामधून विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देण्यात आले.

१३ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण

राज्यभरातील ८ हजार शाळांमध्ये असलेल्या संगणक प्रयोगशाळेत कार्यरत संगणक शिक्षकांनी सुमारे १३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे दिले मात्र सन २०१९ पासून कंत्राटं संपल्याने विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित आहेत.तसेच संगणक शिक्षक बेरोजगार झाले आहेत.

नवीन शैक्षणिक धोरण महत्वाची

राज्यात या वर्षी पासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाली आहे. त्यात विद्यार्थीभिमुख शिक्षण व तंत्रज्ञान आधारित अध्यापनावर भर दिल्याचे  दिसून येत आहे मात्र स्थानिक पातळीवर शाळांमध्ये आयसीटी प्रयोगशाळा ह्या शिक्षकांविना आहेत मग तंत्रज्ञानाचे शिक्षण कसे होईल हा प्रश्न आहे.त्यामुळे शासनाने आयसीटी प्रशिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संगणक व तंत्रज्ञानांचे धडे मिळतील.

संगणक शिक्षकांच्या मागण्या

आयसीटी विषय इयत्ता ५ वी पासून अनिवार्य करावा,काम केलेल्या अनुभवी संगणक शिक्षकांना तात्काळ पुनर्नियुक्ती द्यावी,मंजूर आयसीटी विशेष शिक्षक पदांवर कोणत्याही अटीशिवाय समावेश करावा, डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाने तातडीने आदेश जारी करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

आयसीटी योजनेअंतर्गत आम्ही पाच वर्ष विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देण्याचे काम केले.मात्र कंत्राट संपल्याने आम्ही बेरोजगार झालो.संगणक शिक्षकाअभावी संगणक प्रयोगशाळा आजही धुळखात पडल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित आहे.त्यामुळे शासनाने पूर्ववत आम्हाला नियुक्ती देऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घावा. – निनाद गोंदोळे , माजी संगणक शिक्षक.