लोकसत्ता टीम
अकोला: आकाशात पश्चिमेस तीन ग्रह आणि पूर्वेस उल्कांचा पाऊस असा अतिशय मनोहारी व नयनरम्य आकाश नजारा २७ ते २९ जुलैदरम्यान पाहता येणार आहे. खगोल प्रेमींनी या अनोख्या दुर्मीळ नजाऱ्याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
पश्चिम आकाशात २७ जुलै रोजी सिंह राशी समूहात लाल रंगाचा मंगळ व त्याच्या खालच्या बाजूला सर्वात लहान बुध ग्रह आणि सिंह राशीतील ठळक तारका मघा ही अगदी जवळ बघता येणार आहे. खालच्या बाजूला तेजस्वी शुक्र अतिशय उत्कृष्ट दर्शनासाठी सज्ज आहे. दुर्बिणीतून बुध ग्रहाची एकादशी सारखी कला तर शुक्र ग्रहाची तृतीये सारखी चंद्राप्रमाणे कला आपल्याला पाहता येईल. २८ आणि २९ जुलै रोजी पूर्वेला साधारण १०.३० नंतर कुंभ राशी समूहातून विविध रंगांच्या उल्का पडताना दिसतील. त्यांचा व तार्यांचा काही एक संबंध नसतो, अशी माहिती प्रभाकर दोड यांनी दिली. काही धूमकेतू किंवा लघु ग्रहांचे अवशेष तुटतांना दिसतील. सोबतीला सर्वात सुंदर वलयांकित शनी ग्रह बघता येणारा आहे. हा उल्का वर्षाव मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास वाढलेला असेल. या निमित्ताने दिवसा ढगातील आणि रात्री उल्कांचा पाऊस असा अनोखा अनुभव घेता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
आणखी वाचा-नागपूरकरांनो सावधान! शहरात डोळ्यांची साथ; १०० पैकी २५ रुग्णांना संसर्ग, महापालिकेकडे केवळ…
पंचकचा अनोखा योग अनुभवला
पश्चिम क्षितिजावर पाच खगोल एकत्र येण्याचा अनोखा आकाश नजरा खगोल प्रेमींनी नुकताच अनुभवला आहे. पावसाळी दिवस असले तरी अधून मधून आकाशातील काही भागात ग्रह-ताऱ्यांचे दर्शन घडून येत असते. पावसाळी दिवसात वातावरणातील धुलीकण खाली आल्याने आकाश अधिक चांगल्यापैकी पाहता येऊ शकते. ग्रह, उपग्रह, ताऱ्यांचे पंचक पाहण्याचा अनोखा योग २० जुलैला जुळून आला होता. खगोल प्रेमींसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरली, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
