नागपूर : कृषी, पर्यावरण विषयाचे गाढे अभ्यासक, मातीशी नाळ असलेला माणूस, शेतकरी नेते, कुशल संघटक, एअरो नॉटिक क्षेत्रात निष्णात अभियंता, सामाजिक कार्यकर्ते असे बहुआयामी व्यक्तीमत्व अमिताभ मोतीराम पावडे यांचा सोमवारी शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या धंतोलीत रस्ता अपघातात मृत्यू झाला.
धंतोलीतल्या राठी हॉस्पिटल जवळ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. अमिताभ पावडे हे काही खासगी कामानिमित्त सायंकाळी ५. ३० वाजता आपल्या सीडी १०० एम. व्ही. जे ७९०४ या दुचाकीने राठी हॉस्पिटल समोरील चौककडे जात होते. त्याच वेळी भरधाव वेगात आलेल्या एम. एच. ३१ एफ. ई. ६८२४ बुलेटची पावडे यांना धडक बसली. यात गंभीर जखमी पावडे यांना न्युरान हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र मेंदूला झालेल्या अंतर्गत जखमांमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धंतोली पोलीसांनी गुन्हा दाखल करीत बुलेट चालकाचा शोध सुरू केला आहे.
समाजातले शोषित, वंचित, शेतकरी आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अमिताभ पावडे यांनी अखेरच्या क्षणापर्यंत निःस्वार्थ सेवा केली. शहराच्या सामाजिक वर्तूळात अत्यंत आदराचे व्यक्तीमत्व असलेल्या अमिताभ पावडे यांनी समाजसेवेचा वसा वडील मोतीराम आणि आई कुमूद पावडे यांच्याकडून वारसा रुपात स्वीकारला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी विपूल लेखन केले आहे. दैनिक लोकसत्तामध्ये त्यांचे कृषी क्षेत्रातील विविध मुद्यांवर प्रकाशित झालेल्या लेखनाने शेतकरी प्रश्नांना वाचा फोडली.
अमिताभ पावडे यांनी समाजसेवेचा वसा धंतोलीत पहिली रात्र शाळा सुरू करणारे सामाजिक कार्यकर्ते मोतिराम आणि आई कुमूद यांच्याकडून वारसा रुपात स्वीकारला होता. विदर्भात पहिला आंतरजातीय विवाह करणाऱ्या मोतीराम आणि कुमूद यांच्या संस्कारामुळे पावडे कुटुंबाने समाजाविषयी नाळ जपली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणात कार्यकारी अभियंता म्हणून यशस्वी कारकिर्द पूर्ण करण्या एवजी पावडे यांनी पद प्रतिष्ठा झुगारून देत स्वेच्छा निवृत्ती घेऊन स्वतःला समाज कार्यालय वाहून घेतले.
अमरावतीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून उच्च शिक्षित अमिताभ पावडे यांनी नागपुरातल्या केंद्रीय विद्यालयातून प्राथमिक शिक्षण घेतले. मूळचे काटोल तालुक्यातील येरला पावडे येथील रहिवासी अमिताभ पावडे यांनी शेतीशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही.
बुधवार २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मोक्षधाम घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी संजीवनी, परदेशात स्थायिक असलेली मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.