नागपूर : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरावर बजाजनगर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी छापा घालून ताब्यात घेतले.  त्याचे अपहरण करुन त्याच्या कुटुंबियांकडून १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र, त्या व्यापाऱ्याने मित्राला फोन करुन मदत मागितली. त्यामुळे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा डाव फसला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गौरव पराळे आणि राजेश हिवराळे असे आरोपी पोलीस कर्मचारी तर आकाश ग्वालबंशी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गौरव पराळे आणि राजेश हिवराळे हे दोघेही बजाजनगर पोलीस ठाण्यात पोलीस बीट मार्शल म्हणून कर्तव्यावर आहेत.  वादग्रस्त अशी त्यांची ओळख आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालण्याऐवजी दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन ढाबे संचालक, जुगार अड्डे आणि अवैध धंदेवाल्यांकडून वसुली करण्यात दोघेही अग्रेसर होते. सोमवारी दुपारी अजय वाघमारे या शेअर ट्रेडिंग करणाऱ्या व्यावसायिकाला लुबाडण्याचा कट  गौरव पराळे आणि राजेश हिवराळे यांनी रचला. त्या कटात  आकाश ग्वालबंशी व त्याच्या मित्राला सहभागी करुन घेतले. अजय वाघमारे यांच्या घरी छापा घातला. त्यांना कारमध्ये कोंबले आणि एका ठिकाणी नेले. वाघमारे यांना दमदाटी करुन आणि अटक करण्याची धमकी देऊन १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे आणण्याचा बहाणा करुन अजय यांनी एका मित्राला फोन केला. 

हेही वाचा >>>“तुझ्या बहिणीशी माझे प्रेमसंबंध, आम्ही शारीरिक…” बोलणे ऐकताच भावाने केला मित्राचा खून

पोलिसांनी माझे अपहरण केले असून खंडणी मागत असल्याचे मित्रांला सांगितले. मित्र अडचणीत असल्याचे बघून त्यानी हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठले . घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी लगेच वाघमारे यांचे ‘लोकेशन’ घेऊन घेराव घातला. तेथे चक्क वर्दीतील दोन पोलीस कर्मचारी व्यापाऱ्याला मारहाण करताना दिसले. त्यांनी  गौरव पराळे आणि राजेश हिवराळे  तसेच आकाश ग्वालबंशी यालाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर अपहरण आणि खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होताच बजाजनगर पोलिसांनी दोन्ही कर्मचारी कर्तव्यावर हजर नव्हते, अशी नोंद पोलीस ठाण्यात केली आहे, हे विशेष.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर पोलिसांना झाले तरी काय?

गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरु झाली आहे. हद्दीत अवैध धंदे, दारु, मटका, जुगार, देहव्यापार, रेती तस्करी, सुपरी तस्करीसह क्रिकेट सट्टेबाजी बिनधास्त सुरु आहे.