गोंदिया: सालेकसा तालुक्यातील गोर्रे या गावातील दोन तरुण धरणात आंघोळीसाठी गेले असताना बुडाले. ही घटना आज शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. प्रशांत नरेश पटले (२१) रा.गोर्रे ता.सालेकसा आणि प्रतीक दौलत बिसेन (२१) रा.गोर्रे ता.सालेकसा जिल्हा गोंदिया असे त्यांची नावे आहेत. यांच्याचसोबत गेलेला समीर रमेश बिसेन (२०) रा.गोर्रे ता.सालेकसा हा बचावला.

समीरने या घटनेची माहिती गावात दिल्यानंतर गावात शोककळा पसरली. माहिती कळताच सालेकसाचे पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांनी या बाबतची माहिती सालेकसाचे तहसीलदार नरसय्या कोंडगुर्ले यांना दिली. त्यांनी गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कळवून तरुणाच्या शोधाकरिता आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात केले.

आपत्ती व्यवस्थापन पथकाने धरणाचे द्वार बंद करून शोध सुरू केला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक भूषण बुराडे आपल्या पथकासह उपस्थित आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच आमदार संजय पुराम, देवरी येथील उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, सालेकसाचे तहसीलदार नरसय्या कोंडगुर्ले यांनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेतून बचावलेल्या समीर बिसेन याने कुटुंबीयांना दिलेल्या माहिती नुसार, प्रशांत आणि प्रतीक हे दोघे पुजारीटोला कालव्यात आंघोळीसाठी गेले. परंतु, दोघेही खोल पाण्यात बुडाले. या घटनेतील प्रशांत पटले हा परभणी येथे पशुवैद्यकीयचा अभ्यासक्रम करत होता.

प्रतीक दौलत बिसेन हा सालेकसा येथील मनोहर भाई पटेल महाविद्यालयात शिक्षण घेत होता. हा कालवा पुजारीटोला धरणापासून सुरू होऊन बेहाला गावातून मध्य प्रदेशकडे वाहत जातो. गोंदियातून पोहचलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाद्वारे दोन्ही तरुणांचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी दिली.