अमरावती : वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या दोन तरुणांनी महावितरणच्या खारतळेगाव येथील वीज उपकेंद्रात शिरून कार्यालयातील खुर्ची आणि टेबल पेटवून दिला. तेथे उपस्थित कनिष्ठ अभियंता तेथून तडकाफडकी निघून गेल्याने त्यांचा जीव बचावला. ही थरारक घटना रविवारी दुपारी घडली.

याप्रकरणी कनिष्ट अभियंता गोपाल इंगळे (३८, अमरावती) यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी वलगांव येथील अविनाश निर्मळ व विनीत तायडे यांच्याविरूद्ध हत्येचा प्रयत्न व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. यात उपकेंद्रातील टेबल खुर्ची व त्यावरील शासकीय दस्तावेज जळून गेले. आरोपींनी कार्यालयाच्या खिडक्यांची तोडफोडदेखील केली.       

कनिष्ठ अभियंता गोपाल इंगळे हे रविवारी दुपारी महावितरणच्या खारतळेगाव वितरण केंद्रात आपले सहकारी वरिष्ठ तंत्रज्ञ अजय धाकडे, यंत्र चालक गोपाल नेरकर व सुरक्षा रक्षक मिलिंद पानबुडे यांच्यासह नियमित कामकाज करीत होते. त्यावेळी गजाननधाम रेवसा येथील काही नागरिकांचे विद्युत पुरवठा सुरळीत राखण्याचे निवेदनदे खील इंगळे यांनी स्वीकारले. या दरम्यान, वलगांव अविनाश निर्मळ व विनित तायडे हे उपकेंद्रात आले. त्यांच्या हातात चार प्लास्टिकच्या बाटल्या होत्या.

आमच्याकडे वीज राहत नाही, तुम्ही कार्यालयामध्ये बसून काय काम करता? आम्ही तुमचे कार्यालय पेटवून देणार आहोत, तुम्हालासुध्दा पेटवून देणार आहोत, अशी धमकी त्यांनी इंगळे यांना दिली. त्यावेळी इंगळे व धाकडे यांनी त्यांन समजावण्याचा प्रयत्न केला. एका तरूणाने त्याच्या हातातील बाटलीमधील पेट्रोल उपकेंद्रातील टेबलवर व इतरत्र शिंपडले. इतर टेबलवरील कागदपत्रे दोघांनी फेकून दिली. 

एका कर्मचाऱ्याने टेबलवरील दस्तावेज सुरक्षित ठिकाणी नेण्याचा तर इंगळे व अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. इंगळे हे मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडीओ घेत असताना विनीत तायडे याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. विनितने लगेच आगपेटीने ऑफिसमधील टेबलला आग लावून दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या अंगावर अविनाश निर्मळ याने पेट्रोल ओतले. तो आगपेटी लावणार, तेवढ्यात आपण तायडे याच्या हातातील आपला मोबाईल हिसकावून भीतीपोटी कार्यालयाबाहेर पळालो. कार्यकारी अभियंता लांडे यांना घडलेली घटना सांगितली. त्यावेळी दोन्ही आरोपींनी त्यांच्या एमएच २७ एबी ८५८ या दुचाकीने तेथून पळ काढला, असे इंगळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.