नागपूर : सध्या पॅसिफिक महासागरात “टायफून” नावाचे चक्रीवादळ घोंगावत आहे. या वादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. मात्र, या वादळाच्या अप्रत्यक्ष परिणामला सामोरे जावे लागणार आहे. राज्यापर्यंत पोहोचणाऱ्या मान्सूनवर ते परिणाम करू शकतात, ज्यामुळे विदर्भात पावसाचे प्रमाण वाढू शकते. “टायफून” थेट महाराष्ट्रावर परिणाम करत नाही, तर त्याचा प्रभाव अप्रत्यक्ष असतो.
राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरावर २४ सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रात २८ सप्टेंबरपर्यंत जाणवू शकतो. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान राहणार असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याचा अंदाज काय…
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मात्र २६ सप्टेंबरपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव राज्यभर दिसून येईल. २६ सप्टेंबरला विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व व दक्षिणेकडील भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर २७ सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. २८ सप्टेंबरला राज्याच्या पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील शेतकरी तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. यासोबतच कृषी विभागानेही शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
“टायफून” चा हवामानावर काय परिणाम…
“टायफून” हे पॅसिफिक महासागरात तयार होणारे चक्रीवादळ आहे, जे थेट महाराष्ट्राला धडकत नाही. या “टायफून”चा अप्रत्यक्षपणे भारतीय मान्सूनवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भासारख्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते. पॅसिफिक महासागरातील “टायफून”मुळे हवामानातील बदलांना चालना मिळते आणि त्यामुळे भारतीय उपखंडात पावसाचा जोर वाढू शकतो, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. सध्या पॅसिफिक महासागरात “टायफून” तयार झाले आहेत, ज्याचा अप्रत्यक्ष प्रभाव महाराष्ट्रावर जाणवत आहे आणि विदर्भात पावसाचे प्रमाण वाढले आहे.