नागपूर : राज्यभरात उद्धव ठाकरे सेनेला शिंदे सेनेकडून मोठा दणका दिला जात आहे. अनेक मोठे पदाधिकारी ठाकरे गट सोडून शिंदे गटात सहभागी होत आहेत. नागपुरातील अनेक माजी नगरसेवक,माजी शहरप्रमुखांसह पूर्व विदर्भातील जिल्हाप्रमुख व इतरही पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शनिवारला पक्षात प्रवेश केला.
नागपुरातील माजी नगरसेवक अजय दलाल, माजी नगरसेविका अल्का दलाल, परसराम बोकडे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहित मिश्रा, गडचिरोलीचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल, माजी शहर प्रमुख राजू तुमसरे, कॉंग्रेसचे राजेश कुंभलकर, रवी गाडगे, वसीम कलाम, राष्ट्रवादीचे इब्राहीमभाई झाडीया. चित्रपट कलावंत संजय ठाकरे, ग्रामीण मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय किनकर, विद्युत कर्मचारी संघटनेचे अनेक पदाधिकारी,एआयएमआयचे जिल्हाध्यक्ष सोहेल अहमद, कारंजाचे माजी शिक्षण सभापती सतीश इंगळे, शिक्षक सेनेचे प्रकाश नाईक, विजय लिचडे, आनंद शर्मा, गणेश रामटेके, अ.भा. परीवार पाटींचे अरवींद सुरोशे, पुलगावचे जय दोराईस्वामी, आवींचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजय कामडे आदी प्रमुखांचा समावेश आहे.
दरम्यान, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे. काहींनी कार्यकर्त्यांना घरगडी समजायला लागले. हे सर्व अस्वस्थ करणारे होते. त्यामुळे माझ्या शब्दावर विश्वास ठेवून ५० आमदार सोबत आले. आज शिल्लक शिवसेना उरली का? अशी विचारणा करीत शिंदे गटाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भंडारा येथील कार्यक्रम आटोपून आल्यावर विमानतळाजवळील मेट्रोरेल्वे सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते शनिवारी बोलत होते. यावेळी ठाकरे गटाचे अनेक मोहरे शिंदे गटाने गळाला लावले.
बैठकीला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट,राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार मनीषा कायंदे, माजी मंत्री व संपर्क प्रमुख डॉ. दीपक सावंत, आमदार कृपाल तुमाने, माजी आमदार राजेश क्षीरसागर, पुर्व विदर्भ संघटक किरण पांडव, माजी आमदार मनोहर चंद्रीकापुरे,दुष्यंत चतुवेंदी, निलेश हेलोंडे, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, विनोद सातंगे, शुभम नवले, शहरप्रमुख सूरज गोजे यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझ्यासाठी कार्यकतें मोलाचे आहेत. कार्यकर्त्यांना बळ देणे माझे कर्तव्य आहे.याच कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर निवडणूकीत यश मिळाले. आगामी निवडणूकीतही याच कार्यकर्त्यांच्या बळावर विश्वास सार्थ करून दाखवू. कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल असे सांगत त्यांनी कुणी कितीही प्रयत्न केले तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही दिली.