अमरावती : राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण, असा अर्थ काही नेत्यांनी घेतला आहे. पण, राजकारण हे समाजकारण समजून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आयुष्यभर कार्य केले. राजकारणाच्या धुळवडीतही त्यांनी सर्वच क्षेत्रात केलेले कार्य हे लक्षात राहण्याजोगे आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांचा गौरव केला.

श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती उत्सवात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. शरद पवार व नितीन गडकरी यांच्यासह माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ७ हजार २०५ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांनी शेती करून अन्नधान्य पिकवावे हे मान्य असले तरी त्यांच्या शेतमालाला योग्य भावही मिळाला पाहिजे. आता शेतमालाचे भाव जागतिक बाजारात ठरतात. त्यामुळे पीक पद्धतीत मागणी पाहून उत्पादन घेण्याचा विचार करावा लागेल. शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात केलेले शेतीविषयक यशस्वी प्रयोग विदर्भातही राबविण्याची गरज आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषी व शिक्षण क्षेत्रात काम करताना पुढील शंभर वर्षांचे उद्दिष्ट ठेवले होते. गावांचा आर्थिक विकास व प्रगती झाली पाहिजे, ही त्यांची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी या क्षेत्रातील संशोधन त्या पातळीवर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. गावांमधून महानगरांकडे स्थलांतर वाढले आहे. त्यामुळे शहरावरील भर वाढला आहे. तीस टक्क्यांपर्यंत स्थलांतराचे प्रमाण आज आहे. ते रोखणे आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले.

यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच लाख रुपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रमाणेच शरद पवार यांचे कार्य आहे, असे गौरवोद्गार काढत त्यांनी हा सत्कार यथोचित ठरविला.

हेही वाचा – अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उपायुक्‍त कार्यालयावर मोर्चा

सत्काराला उत्तर देताना खासदार शरद पवार म्हणाले, भाऊसाहेबांपासून प्रेरणा घेत अनेकांनी या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. भाऊसाहेबांची प्रेरणा, दृष्टी घेऊन नवीन पिढी तयार होईल, असा मला विश्वास आहे.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. कोशध्यक्ष दिलीप इंगोले यांनी आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२५ रुपयांच्या नाण्यांचे विमोचन

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कृषी व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ रुपयांचे विशेष नाणे काढले आहे. नितीन गडकरी व शरद पवार यांच्या हस्ते या नाण्यांचे विमोचन करण्यात आले.