लोकसत्ता टीम

नागपूर : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा ओघ कमी झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागातून थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल सुद्धा लागली आहे. मात्र, त्याचवेळी आता विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

उत्तर भारतात यावर्षी कडाक्याची थंडी होती. परिणामी उत्तरेकडील थंड वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवला. आता उत्तरेकडील थंडी कमी झाल्यामुळे राज्यातील अनेक भागातून थंडीने सुद्धा काढता पाय घेतला आहे. थंड वाऱ्यामुळे रात्री आणि पहाटेच्या सुमारास हलका गारवा जाणवत आहे. तरीही किमान तापमानसह कमाल तापमानातसुद्धा वाढ होत आहे. त्यामुळे आता दिवस उन्हाचे हलके चटके जाणवू लागले आहेत.

आणखी वाचा-छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक; घातपाताचा डाव उधळला, शस्त्रसाठा जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आजपासून महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ ते तेलंगणा, कर्नाटक पर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक वातावरण आहे. तर आजपासून अरुणाचल प्रदेशसह पश्चिम बंगाल, नागालँड, मेघालय, आसाम,त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर याठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे.