नागपूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच भारतातून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर २५ टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याची घोषणा केली.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भारताला ‘टॅरिफ किंग’ म्हणून संबोधले आणि असा आरोप केला की, भारत अमेरिकेच्या वस्तूंवर जास्त दराने कर लावतो, तर अमेरिकेने भारतीय वस्तूंना तुलनात्मक सवलती दिल्या आहेत. यासोबतच, भारताने रशियाकडून तेल आणि संरक्षण उपकरणांची मोठ्या प्रमाणात खरेदी चालू ठेवल्यामुळे, अमेरिका या व्यवहारांना आंतरराष्ट्रीय धोरणांच्या विरोधात मानते आणि म्हणून भारतावर ‘पेनाल्टी टॅरिफ’ म्हणजेच दंडात्मक शुल्कही लावण्यात येईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

ट्रम्पच्या या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होणार आहे. अमेरिका हा भारताचा एक प्रमुख निर्यात बाजार आहे. विशेषतः कापड, औषधे, रसायने, दागिने, सिरेमिक्स आणि समुद्री उत्पादने या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात निर्यात होते. यावर अचानक २५ टक्के आयात शुल्क बसल्याने अमेरिकन खरेदीदार दुसऱ्या देशांकडे वळू शकतात, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांचे नुकसान होईल.

ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून, याचे दूरगामी परिणाम भारताच्या जागतिक व्यापार धोरणावर होऊ शकतात. मात्र ट्रम्पच्या या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री निती गडकरी यांनी त्यांचे नाव न घेता टीका केली. ट्रम्पच्या या निर्णयाचा भारताच्या उद्योगांवर परिणाम कमी करण्यासाठी गडकरींनी एक महत्वपूर्ण उपाय देखील सुचविला आहे.

गडकरींनी काय सुचविले?

गडकरी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गडकरींनी अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांनी भारतावर लावलेल्या २५ टक्के टॅरिफचा उल्लेख केला. गडकरींनी यावर उपाययोजनाही सांगितले. गडकरी म्हणाले, ‘औद्योगिक विकासात लॉजिस्टिक खर्च हा अतिशय महत्त्वाचा असतो. देशात १६ टक्के लॉजिस्टिक खर्च होता. देशात उत्तम दर्जाचे रस्ते तयार झाल्याने आता हा खर्च १० टक्क्यांवर आला आहे. चीनमध्ये हा खर्च ८ टक्क्यांवर आहे. येत्या डिसेंबरपर्यंत ‘लॉजिस्टिक’ खर्च ९ टक्के येईल, असा विश्वास आहे. रस्ते चांगले झाल्यामुळे हे शक्य झाले आहे.

आता इंधन बदलवून हा ‘लॉजिस्टिक’ खर्च कमी करण्यासाठी विविध कंपन्यांसोबत कार्य सुरू आहे. येत्या काळात जर हायड्रोजन आधारित इंधनाचा वापर वाढला तर हे सहज शक्य आहे, असे गडकरींनी सांगितले. गडकरींनी भाषणादरम्यान ट्रम्पवर अप्रत्यक्षपणे टीका केली आणि म्हणाले, टॅरिफ बदलाच्या स्थितीचा अनुभव तुम्ही घेतच आहात. यावर लॉजिस्टिक खर्च कमी करणे हाच एकमेव उपाय आहे, असे गडकरी म्हणाले.