शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची २४ जानेवारीला मुंबईत अधिकृत घोषणा झाली. यामुळे भविष्यात वंचित महाविकास आघाडीत सहभागी होणार काय, अशी चर्चा सुरू असतानाच बुलढाण्यात मात्र वंचित आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातील वंचितच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारार्थ स्थानिक गर्दे वाचनालय सभागृहात सोमवारी (दि. २४) संध्याकाळी उशिरा आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आ. राजेंद्र शिंगणे यांनी मोजक्या माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यानंतर अमरावती पदवीधर मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल अमलकार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना पाठिंबा देण्यासंदर्भात आमची बोलणी सुरू आहे, असे ते म्हणाले. लवकरच त्याला यश मिळणार असल्याचे वक्तव्यही शिंगणे यांनी केले.

हेही वाचा – “रुपयाच्या अवमूल्यनामुळेच कापसाला ८ हजारांचा भाव”, विजय जावंधियांचे पंतप्रधानांना पत्र, म्हणाले, “अमेरिकेत शेतकरी..”

हेही वाचा – खर्च मर्यादा नसल्याने ‘शिक्षक’ची निवडणूकही महागली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे वृत्त आज सार्वत्रिक झाल्यावर अनिल अमलकार यांनी खामगाव येथे माध्यमांशी बोलताना त्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही तर, त्यांनी कार्यकर्त्यांसह खामगाव पोलीस ठाणे गाठून तक्रारच दाखल केली. आ. शिंगणे किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यांकडून वंचितच्या नेत्यांसोबत बोलणे झालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आ. शिंगणे यांनी चुकीचे वक्तव्य करत मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. हा आचारसंहितेचा भंग असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अमलकार यांनी तक्रारीद्वारे केली आहे.