नागपूर : माल्टा देशाचे एक शिष्टमंडळ नागपुरात आले होते. शिष्टमंडळाने विदर्भातील जंगल सफारीचे त्यांच्या देशात ब्रँडिंग करण्याचे आश्वासन दिले. सोबत विदर्भातील तांदूळ, गोडे तेल, शेतमालाचा दर्जा बघत तेही माल्टाला आयात करण्याबद्दल संकेत दिले. तर माल्टातील काही वस्तू व तंत्रज्ञान भारतात देण्याचीही तयारी दर्शवली.
असोसिएशन फाॅर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी), नागपूरतर्फे नागपुरातील प्रेस क्लबमध्ये सोमवारी माल्टाच्या शिष्टमंडळाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी माल्टा प्रजासत्ताकातील आयओडीआरचे गव्हर्नर प्रा. डॉ. लेलो मारा, डिप्लोमॅट व आंतरराष्ट्रीय सचिव मर्सेलो पाट्टी, भारतातील प्रतिनिधी डॉ. अफझल मिथा उपस्थित होते. मर्सेलो पाट्टी म्हणाले, विदर्भात घनदाट जंगल असून वाघासह इतरही प्राण्यांचे आकर्षण संपूर्ण जगाला आहे. आम्ही स्वत: पर्यटनातून हे अनुभवले आहे.
माल्टा येथे जंगल व प्राणी नाही. त्यामुळे भारतातील विदर्भ भागातील जंगल पर्यटनाचे ब्रँडिंग आम्ही माल्टाला करून येथे पर्यटक वाढीसाठी मदत करू. सोबत विदर्भात चांगल्या दर्जाचे तांदूळ, गोडे तेल व इतरही शेतमालाचे उत्पादन होते. या वस्तूही माल्टाला आयात करून तेथील पर्यटकांना चांगल्या खाद्यवस्तू देण्याचा प्रयत्न करू. परंतु, त्यासाठी येथील व्यवसायीकांनी युरोपियन देशात आवश्यक परवानगी व मंजुरी घेण्याची गरज असल्याचेही डॉ. पाट्टी यांनी सांगितले.
डॉ. अफझल मिथा म्हणाले, माल्टाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी गडकरींच्या कुटुंबीयांकडून त्यांना त्यांच्या शेतातील मोठा कांदा दाखवला गेला. शिष्टमंडळाला भारतातील इको-टुरिझम, सागरी व साहसी पर्यटन, रिसाॅर्ट विकास, डिजिटल पर्यटन प्लॅटफाॅर्म तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक देवाणघेवाण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संधीवरही चर्चा झाली. या संवादामुळे भविष्यात विदर्भात व्यापार, तंत्रज्ञान हस्तांतरण व परस्पर गुंतवणुकीसाठी नव्या वाटा खुलण्यास मदत होणार असल्याचेही डॉ. मिथा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला एआयडीचे गिरधारी मंत्री, डॉ. विजय कुमार शर्मा उपस्थित होते.
संरक्षण उत्पादन, अन्न प्रक्रियावरही चर्चा
माल्टाच्या शिष्टमंडळासोबत पर्यावरणीय सेवा, संरक्षण उत्पादन, प्लास्टिक व पॅकेजिंग, अन्न प्रक्रिया, आयटी- बीपीएम क्षेत्रांतील विदर्भातील प्रगत उद्योगांचे सादरीकरण केले गेले. या सगळ्यांचा उपयोग माल्टाला शक्य असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
विदर्भातील प्रगतीची माहिती
माल्टाच्या शिष्टमंडळाला विदर्भातील सहा व्याघ्र प्रकल्प, खिंडसी तलावातील साहस पर्यटन केंद्रे, समृद्धी महामार्ग, कार्गो रेल्वेची द्रूत वाहतूक सुविधा, लक्झरी रिर्सार्ट्स, एमटीडीसीची गुंतवणुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे येत्या काळात विदर्भाचा विकास झटपट होणार असून येथे माल्टा देशाला विविध क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी असल्याचेही सांगण्यात आले.