अकोला : देशभर सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यातच येत्या रविवारी होळी व त्यानंतर रंगांचा सण धुळवड असल्याने राजकीय नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी बहुतांश मतदारसंघात अद्याप लढतीचे समीकरण स्पष्ट झालेले नाही. उमेदवारांची यादी जाहीर करण्यात ‘मविआ’ व महायुतीमध्ये घोळ कायम आहे. त्यामुळे धुळवडीनंतरच मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या रंगांची उधळण होणार असल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन आता आठ दिवस लोटले आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात वर्धा वगळता पूर्व विदर्भातील मतदारसंघात निवडणूक होणार आहे. या मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. अंतर्गत बंडखोरी व नाराजी टाळण्यासाठी अनेक पक्षांनी अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला असून, कुणाला उमेदवारी मिळणार यावरूनच चर्चा रंगत आहेत. इच्छूक उमेदवारी मिळण्यासाठीच आपली शक्ती पणाला लावत आहेत. काही मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित झाले आहेत. भाजप विदर्भातील प्रमुख मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले. ‘मविआ’ व महायुतीमध्ये जागा वाटपावरून ओढाताण सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवार जाहीर करण्यात सावध पवित्रा घेतला जात आहे.

हेही वाचा…चंद्रपूर : बाजारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुखवटे; आचार संहितेचा भंग? खर्च कोणाच्या खात्यात…

पहिल्या टप्प्यात १९, तर दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा अल्प कालावधी राहिला असला, तरी राजकीय वातावरण म्हणावे तसे तापलेले नाही. उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली आणि पारा चढू लागल्यावरही राजकीय तंबूत शांतता आहे. प्रत्यक्ष प्रचाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापासूनच सुरुवात होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असल्याचे आतापर्यंत एकाही मतदारसंघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. उमेदवारी देण्यावरून पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, यावर चित्र अवलंबून राहणार आहे. उमेदवार सध्यातरी जुळवाजुळव व दिल्लीच्या वाऱ्या करण्यात गुंतले आहेत. ‘मविआ’ व महायुतीमध्ये असंतुष्टांची संख्या वाढली आहे. नाराजी व गटबाजीमुळे निवडणुकीतील रंगत नक्कीच वाढणार आहे. सध्याची स्थिती बघता होळी आटोपल्यानंतरच राजकीय धुळवड व प्रचारात रंग भरले जाणार असल्याचे स्पष्ट आहे.

हेही वाचा…नागपुरात लोकसभेसाठी अर्जविक्री जोरात, काय आहे राजकीय गणितं?

धुळवडीच्या निमित्ताने मनोमिलनावर भर

धुळवडीमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार रंगणार नसला तरी उमेदवारांकडून भेटीगाठी घेण्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. निवडणुकीचे समीकरण जुळवून आणण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. धुळवडीच्या निमित्ताने मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न उमेदवार करणार आहेत.