Vidarbha Heatwave 2025 Update: विदर्भच नाही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तापमानाचा पारा झपाट्याने उंचावतो आहे. विशेषकरून विदर्भातील शहरांमध्ये दररोज तापमानाचे नवे उच्चांक नोंदवले जात आहेत. आता तर जगभरातील उष्ण शहरांशी विदर्भातील शहरांची तापमानाच्या बाबतीत जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी विदर्भातील चंद्रपूर या शहराचे नाव तापमानाच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत पहिले होते.

गेल्या काही दिवसात विदर्भाच्या शहरांची जगभरातील शहरांशी उष्णतेची स्पर्धाच लागली आहे. सर्वात उष्ण शहरांमध्ये बुधवारी ब्रम्हपुरी, चंद्रपूर, अकोला शहराने ४५ अंश सेल्सिअस पलीकडे जात तापमानाचा उच्चांक गाठला. तर दुसरीकडे नागपूरसह इतर चार शहरांमध्ये ४४ अंश सेल्सिअस पेक्षा अधिकच्या तापमानाची नोंद करण्यात आली.

सूर्याचे आग ओकणे सुरूच असून आजपासून तीन दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मंगळवारी चंद्रपूर शहरात ४५.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. जागतिक पातळीवर ते दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. बुधवारी त्यात अंशतः घट झाली. तापमान तीन अंशाने कमी होत ४५.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. तर त्याचवेळी जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात तापमान अंशतः वाढून ४५.६ अंशासह हे शहर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहचले आहे.

दुसरीकडे अकोला शहरातील तापमानाचा पारा उसळत ४५ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. इतर शहरात देखील तापमानाची घोडदौड कायम आहे. कधीकाळी लवकर थंड होणारी उपराजधानी म्हणजेच नागपूर शहरात तापमान २४ तासात अंशतः वाढून ४४.४ अंश सेल्सिअसवर पोहचले. मात्र, जाणीव ४५ अंश सेल्सिअस तापमान असल्यासारखी होती. तिकडे वर्धा ४४.७ अंश सेल्सिअस, अमरावती ४४.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, यात धक्कादायक म्हणजे सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोलीचे तापमान ४४.६ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. तर भंडारा, यवतमाळ, वाशिम शहरात तापमान ४३ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहेत. गोंदियात पारा ४२.५ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे. प्रचंड वाढलेल्या तापमानाने नागरिकांची प्रचंड होरपळ होत आहे. उष्णतेमुळे काही नागरिकांचे मृत्यु झाल्याची माहिती आहे. दुपारनंतर रस्त्यावरील वर्दळही कमी झाली आहे. अशात सूर्याचा प्रकोप पुढेही कायम राहणार असून २३ ते २६ एप्रिलपर्यंत उष्ण लाटांचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.