लोकसत्ता टीम

नागपूर : विजय हजारे ट्रॉफीत विदर्भाने सलग चौथा विजय प्राप्त केला आहे. बुधवारी जयपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात विदर्भ संघाने झारखंडचा एकतर्फी धुव्वा उडवित १० गडी राखून विजय प्राप्त केला. झारखंड संघाला १०७ धावांवर रोखून केवळ १३.४ षटकात विदर्भाने लक्ष्याची प्राप्ती केली.

विदर्भाने नाणेफेक जिंकून झारखंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विदर्भाकडून यश ठाकूरने २७ धावा देत ३ गडी बाद केले. अक्षय कर्णेवार आणि दर्शन नळकांडे यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. झारखंडचे केवळ चार फलंदाज दुहेरी धावसंख्यापर्यंत मजल मारू शकले. झारखंड संघाला ३३ षटकात रोखल्यावर विदर्भाच्या सलामीवीर फलंदाजांनी सहजपणे लक्ष्य प्राप्त केले. अथर्व तायडेने ७० धावा केल्या. त्याला अक्षय वाडकरने ३३ धावा काढत सहाय्य केले.

आणखी वाचा-बहुतांश मागण्या मान्य, उर्वरित मांगण्याची महिन्याभरात पूर्तता; रविकांत तुपकरांचे ‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलन मागे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भाचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे. यापूर्वी मेघालय, मणिपूर आणि महाराष्ट्र संघाला पराभूत करून विदर्भ संघाने १६ गुणांसह स्पर्धेत पहिले स्थान कायम राखले आहे. दुसऱ्या स्थानावर १२ गुणांसह सर्व्हिस क्रिकेट संघ आहे. विदर्भाचा पुढील सामना १ डिसेंबरला तिसऱ्या स्थानावर असलेल्या छत्तीसगड संघाविरुद्ध खेळला जाणार आहे.