- १२ पैकी सहा जागांवर पराभव, काटोल पुन्हा राष्ट्रवादीकडे
- मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह खोपडे, कुंभारे, मते- काँग्रेसचे राऊत, ठाकरे विजयी
- सावनेरमध्ये केदार, रामटेकमध्ये सेना बंडखोर, कामठीत भाजपची सरशी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर जिल्ह्य़ात विधानसभा निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट झाली असून १२ पैकी सहा जागांवर पक्षाला पराभव पत्करावा लागला. २०१४ मध्ये पक्षाने ११ जागा जिंकल्या होत्या.
दुसरीकडे काँग्रेसने मुसंडी मारत शहरात दोन व ग्रामीणमध्ये दोन अशा एकूण चार जागा जिंकल्या. त्यांच्याकडे पूर्वी फक्त एक जागा होती. काटोलची जागा राष्ट्रवादीने भाजपकडून हिसकावून घेतली. रामटेकची जागा सेना बंडखोराने जिंकली. शहरात भाजपकडे सहा जागा होत्या. या निवडणुकीत दोन जागांचा फटका बसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (द.पश्चिम), विकास कुंभारे (मध्य), कृष्णा खोपडे (पूर्व) हे पून्हा विजयी झाले तर दक्षिणमधून मोहन मते विजयी झाले. काँग्रेसने उत्तर नागपूर व पश्चिम नागपूर या दोन जागा भाजपकडून हिसकावून घेतल्या. येथे अनुक्रमे पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे विजयी झाले. सुधाकर देशमुख व मिलिंद माने हे भाजपचे दोन विद्यमान आमदार पराभूत झाले.
ग्रामीणमध्ये भाजपला सहापैकी फक्त दोनच जागा जिंकता आल्या. चार ठिकाणी पक्षाचा पराभव झाला. २०१४ च्या निवडणुकीत पाच जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत हिंगणा, कामठी या दोन जागा भाजपने कायम ठेवल्या.
काटोल, रामटेक, उमरेड या जागा गमावल्या. काँग्रेसने सावनेरची जागा कायम ठेवत उमरेडची जागा जिंकली तर राष्ट्रवादीने काटोलची जागा भाजपकडून हिसकावून घेतली. भाजपचे समीर मेघे (हिंगणा), टेकचंद सावरकर (कामठी) हे विजयी झाले. काँग्रेसचे सुनील केदार (सावनेर) व राजू पारवे (उमरेड) यांनी विजयाचा झेंडा फडकावला. रामटेकमध्ये सेनेचे बंडखोर आशीष जयस्वाल विजयी झाले. तेथे त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना पराभूत केले.
नागपूर हे संघभूमीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहशहर असल्याने येथे भाजपला दणदणीत विजयाची अपेक्षा होती.
सर्वच्या सर्व जागा जिंकून जिल्हा भगवा करणार अशी घोषणाही पक्षाकडून करण्यात आली होती. प्रचार यंत्रणाही जोरात होती, भाजप आणि संघाचे कार्यकर्तेही जोरात कामाला लागले होते. त्यामुळे ही निवडणूक भाजप एकहाती जिंकेल अशीच चर्चा मतदानाच्या दिवसापर्यंत होती. एक्झिट पोलमध्येही असेच चित्र होते. मात्र मतदारांचा कौल भाजपच्या विरोधात गेल्याचे मतदानातून दिसून आले.