नागपूर : ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा चिघळले असून, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर एकाचवेळी उपरोधिक आणि खरबरीत टीका केली आहे.

आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “जर खरंच २ सप्टेंबरचा ओबीसीविरोधी शासन निर्णय रद्द होणार असेल, तर मी छगन भुजबळ यांच्या पाया पडायला तयार आहे. त्यानंतर मी त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींसाठी पुढे काम करायला तयार आहे.या वक्तव्यामध्ये त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर उपरोधिक टिका करत त्यांना भाजपशी संलग्न असल्याचा आरोप केला. “भुजबळ म्हणतात की ओबीसींचं भलं फडणवीसच करतात. दुसरीकडे मनोज जरांगे म्हणतात की मराठा आरक्षण देणारे, मराठ्यांना ओबीसीमध्ये सामावून घेणारे फडणवीसच आहेत. म्हणजेच भुजबळ आणि जरांगे या दोघांनाही फडणवीसच नायक वाटत असावेत. मग त्यांनी फडणवीसांच्या नावाने ढोल वाजवावेत आणि सांगावं की ओबीसींचे प्रश्न मार्गी लागले. आणि मोर्चे, मिळावे, आंदोलन बंद करावेत,” असा खरबरीत टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

छगन भुजबळ यांनी बीड येथील एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली होती. त्यांनी वडेट्टीवारांवर “आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या भूमिका घेतात,” असा आरोप केला होता. त्यास प्रत्युत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, “कुणबी मराठा, कुणबी जैन, कुणबी सोनार अशा नोंदी आहेत. त्यावेळी जो शेती करत असे त्याला कुणबी म्हटले जात असे. आमची भूमिका स्पष्ट आहे – ज्या मराठ्यांच्या कागदपत्रांमध्ये ‘कुणबी’ अशी नोंद आहे, त्यांनाच ओबीसीमध्ये समाविष्ट करावं. मात्र फडणवीस सरकारने २ सप्टेंबरचा जीआर काढून सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यालाच आमचा विरोध आहे.”

ओबीसी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या निर्णयांबाबत वडेट्टीवार आक्रमक असून, त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “ओबीसींच्या हक्कांवर कुणी गदा आणण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू.” बीडमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “हा मेळावा सत्ताधाऱ्यांचा होता. सरकारच स्वतःच ओबीसीविरोधी जीआर काढते आणि नंतर आंदोलनही करते, हे हास्यास्पद आहे,” असे ते म्हणाले.

वडेट्टीवार यांनी अमळनेर येथील ओबीसी सभेचा उल्लेख करत सांगितले, “त्या सभेत ‘कोयता’ काढण्याची भाषा करण्यात आली होती. आम्ही संविधानिक मार्गाने, शांततेने आणि कायद्याच्या चौकटीत राहून ओबीसींना आरक्षण मिळावे, त्यांचा हक्क अबाधित राहावा, हीच आमची भूमिका आहे.” भुजबळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, “जिथे ‘कोयता’ काढण्याची भाषा होते, अशा प्रकारच्या मेळाव्याला आम्ही जाऊ शकत नाही. आमचा लढा संविधानिक आहे, हिंसेला प्रोत्साहन देणारा नाही.” वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी आरक्षणासंदर्भातील सत्ताधाऱ्यांची भूमिका आणि आंदोलनाची शैली यावर नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकारणातील हे वाद वाढतच चालले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.