नागपूर : ओबीसी समाज भाजपचा ‘डीएनए’ असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर नतमस्तक होऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आणली आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपूर येथे शुक्रवारी आयोजित सकल ओबीसींच्या महामोर्चात ते बोलत होते. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी हा महामोर्चा काढण्यात आला. या निमित्ताने नागपुरात ओबीसींकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. खासदार प्रतिभा धानोरकर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, प्रकाश शेडगे, महादेव जानकर, लक्ष्मण हाके मंचावर उपस्थित होते.

नागपुरातील यशवंत स्टेडियमपासून निघालेला मोर्चा संविधान चौकात पोहोचला व येथे मोठी सभा घेण्यात आली. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, फडणवीस सरकार ३७४ ओबीसी जातींच्या पाठिंब्यावर सत्तेवर आले. त्यावेळी त्यांनी ओबीसी हा आमचा ‘डीएनए’ असल्याचे सांगितले होते. पण आता तेच मुख्यमंत्री एका अशिक्षित व्यक्तीसमोर मान तुकवत आहेत आणि मराठा समाजाला ओबीसींमध्ये सामावून घेण्याचे षडयंत्र रचत आहेत. फडणवीस सरकारने २ सप्टेंबर रोजी घेतलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता आहे. मराठा समाजातील हजारो जणांना रोज ओबीसी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत, तर दुसरीकडे ओबीसी तरुणांमध्ये आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. सरकारने हा शासन निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर पुढील टप्प्यात मुंबई, पुणे, ठाण्यात मोर्चे काढले जातील, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. सरकार म्हणते, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. पण प्रत्यक्षात ओबीसींमध्ये घुसखोरी सुरू आहे. सरकारमध्ये क्षमता असेल तर तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण द्यावे, असे आव्हानही वडेट्टीवार यांनी दिले.

शासन निर्णय रद्द करून ‘डीएनए’ सिद्ध करा

मराठा समाज बलाढ्य असून ओबीसी समाज कुपोषित आहे. या समाजांमध्ये तुलना होऊ शकत नाही. ही ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे. जर सरकारचा डीएनए ओबीसींचा असेल तर मराठ्यांचा ओबीसीत समावेश करणारा शासन निर्णय त्वरित रद्द करून सरकारने आपला ‘डीएनए’ सिद्ध करावा. अन्यथा, ओबीसी समाज शांत बसणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का नाही -बावनकुळे

नागपूर: ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही, त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपुरातील महामोर्चानंतर बावनकुळे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले. सरकार ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. बोगस प्रमाणपत्रे निघतील असा कुणबी प्रमाणपत्रांबाबत समाजात संभ्रम आहे. मी खात्री देतो की, जे खऱ्या अर्थाने पात्र कुणबी मराठा आहेत, केवळ त्यांनाच प्रमाणपत्रे मिळतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले