यवतमाळ : जिल्ह्यात नगर परिषद हद्दीतील रहिवाशांच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याने या मतदार यादींवर हजारो आक्षेप दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात १० नगर परिषदा आणि एका नगर पंचायतीमध्ये प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर हे आक्षेप आले आहेत.

या आक्षेपांची संख्या बघता, नगर परिषद प्रशासनाने या याद्या तयार करताना कोणतीही खातरजमा न करता, जुन्याच मतदारयाद्या वापरल्याचा आरोप होत आहे. शुक्रवारी आक्षेप दाखल करायच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल १७ हजार ३६ आक्षेप दाखल झाले होते. हे आक्षेप दुरूस्त न झाल्यास नगर परिषद निवडणुकीस न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

नगर परिषदेने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करताच शहरातील नागरिकांनी ओरड सुरू केली. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना विविध प्रभागांमध्ये दाखविण्यात आले आहेत. वात्सव्य नसणारे हजारो मतदार प्रभागांमध्ये दाखविण्यात आले आहे. एका प्रभागात तर चक्क १९९० ची मतदार यादी जशीच्या तशी वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे.

यवतमाळ शहरातील २९ प्रभागांमध्ये दोन लाख ३२ हजार ९९३ मतदार आहेत. नगर परिषदेने या प्रभागांची प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली. इच्छुक उमदेवार आणि जागरूक नागरिकांनी ही यादी पडताळली असता मतदारयादीतील हा घोळ उजेडात आला.

यवतमाळ नगर परिषदेत सर्वाधिक चार हजार ६०१ आक्षेप दाखल झाले. उमरखेड (४२३८), दारव्हा (१५८७), पुसद (११००), नेर (१०७०), पांढरकवडा (९५०), आर्णी (९००), ढाणकी (७८१), घाटंजी (७२९), दिग्रस (६५७) तर वणी नगर परिषदेत ४१५ आक्षेप दाखल झाले आहेत. या आक्षेपांची समोरासमोर सुनावणी होणार नाही.

नगर परिषदेच्या यंत्रणेकडून बीएलओंना सोबत घेवून आक्षेपांनुसार दुरूस्ती केली जात आहे. ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यांदी प्रसिद्ध केली जाणार आहे. यवतमाळ नगर परिषदेने २५० जणांचे पथक तयार करून प्रत्येक प्रभागात दुरूस्तीची प्रक्रिया हाती घेतल्याचे सांगण्यात आले.

मतदार यादीत कट ऑफ लावून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विविध स्तरातून होत आहे. ही बाब घटनाबाह्य असून, प्रारूप मतदार यादीतील आक्षेपांबाबत समोरासमोर सुनावणी न झाल्यास व अंतिम यादीत त्रुटी कायम राहिल्यास नागरिकांना न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. या प्रारूप मतदार याद्यांमुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेत १८ आक्षेप

एकीकडे नगर परिषदेतील प्रारूप मतदार याद्यांवरून वादळ उठले असताना जिल्हा परिषदेच्या गट आणि गणातील मतदार याद्यांवर ग्रामीण भागातून फारसे आक्षेप दाखल झाले नाहीत. जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि १२४ गणांमध्ये आक्षेप नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत केवळ १८ आक्षेप दाखल झाले होते.