वर्धा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी या संस्थेतर्फे होणाऱ्या विविध परीक्षा या बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी समजल्या जातात. आयोगाच्या कोणत्याही परीक्षेसाठी लाखो इच्छुक धाव घेत असल्याचे चित्र नवे नाही. विविध पात्रता स्पष्ट करीत व आहे त्या अटी पूर्ण करीत विद्यार्थी परीक्षा देत असतात. काहींना विविध संस्था तयारी करून या परीक्षासाठी पाठवीत असतात. बार्टी ही संस्था पण विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असते. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आता ही वार्ता महत्वाची ठरणार. अनुसूचित जातीचे जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट – ब २०२४ पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेत अश्यांना ही सुविधा.
या पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी एकरकमी १० हजार रुपयाचीया रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ३० जून ही मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत १० जुलै पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. या मदत योजनेची जाहिरात बार्टीच्या संकेतस्थळा वर पूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी गुगल फॉर्म मध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. पण काही तांत्रिक कारणामुळे गुगल फॉर्ममध्ये अर्ज भरता येत नाही, अश्या तक्रारी झाल्या. हे लक्षात घेऊन आता अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
आता पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी संबंधित लिंकवर जाऊन अर्ज भरण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच १६ जून २०२५ रोजी बार्टीच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केलेला अर्ज योग्यपणे भरून आवश्यक कागदपत्र साक्षांकित प्रतिसह जोडून बार्टी कार्यालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) २८, क्विन्स गार्डन, कॅम्प पूणे या पत्त्यावर पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे.
मात्र एक खबरदारी पण घ्यायची आहे. ऑनलाईन अर्ज पुन्हा करावा. परंतू ज्यांनी हार्ड कॉपी पाठविलेली आहे, त्यांनी नव्याने हार्ड कॉपी सदर कार्यालयास पाठविण्याची गरज नाही. तसेच अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० जून ही होती. आता ती १० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशी वाढवून देण्यात आली आहे. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकातून बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली आहे.