वर्धा : गत दहा दिवसापासून जिल्ह्यास पावसाने अक्षरशः झोडपून काढणे सूरू केले असून आताही अतिवृष्टीचे काळे ढग घोंगावत आहेच. सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला पाण्यात सडत चालला आहे. देवळी तालुक्यास याचा सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र आहे. शेतकरी का हताश होतो व आत्महत्येचा विचार करतो, याचे गावोगावी दाखले मिळत आहे. कर्ज काढून पिकवलेले मोती मातीमोल झाल्याची स्थिती आहे. १० टक्केही पिक हाती लागणार नसल्याचे पाहून शेतकरी घायकुतीस आला आहे.

पावसाचे पाणी आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात येणारे पाणी, दोन्ही थांबता थांबत नाही. देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त गावात भेटी देणे सूरू केले आहे. या भेटीत शेतकऱ्यांच्या व्यथा डोळ्यात पाणी आणून सोडत असल्याचे आमदार बकाने म्हणतात. तांभा गावात भेटी देतांना आ. बकाने यांनी शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी उपस्थित एका वृद्ध शेतकऱ्याशी त्यांनी संवाद साधला. तेव्हा त्या शेतकऱ्याने हंबरडाच फोडला. शेतात यावेळी चांगले पिक आले होते. दसरा दिवाळीत बऱ्यापैकी पैसे हाती पडतील. कर्ज फेडता येईल, अशी आस ठेवली होती. पण तीन दिवसातील पावसाने होत्याचे नव्हते केले. धुऱ्यापर्यंत पाणी साचले. शेतात पाय ठेवता येत नाही. पिक कुठून येणार म्हणत हा शेतकरी ओक्साबोक्षी रडला. त्याच्या पाठीवरून बकाने यांनी हात फिरवीत धीर दिला. वाऱ्यावर सोडणार नाही, अशी हमी दिली.

असेच सार्वत्रिक पिक चित्र आहे. असंख्य शेतांचे तलाव झाल्याचे पाहायला मिळते. गावातील घरे, गोठे पडायला लागले आहेत. अनेक गावात रस्ते उखडून गेलेत. परिणामी विद्यार्थी शाळेत जावू शकत नाही. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असल्याने मदत मिळेपर्यंत कृषी व महसूल विभागाने गावात भेटी देऊन पाहणी सूरू करावी. नुकसानीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावे. नुकसान वेळेत नोंदवून पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश आ. बकाने यांनी दिले आहे. प्रसंगी विधानसभेत प्रश्न मांडू पण शेतकऱ्यांना न्याय देवू, अशी खात्री ते देत आहे. आपली भूमिका स्पष्ट करतांना आमदार बकाने म्हणाले की अतिवृष्टी व संभाव्य मदत यावर सर्वच आमदारांनी एकत्र आले पाहिजे.

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी सभेत मी यावरच लक्ष वेधले. जिल्ह्यास पावसाची झळ बसली आहे. म्हणून पक्षाच्या चारही आमदारांनी मिळून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे रेटून धरावी. मदत मिळावी म्हणून पाठपुरावा करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्याची व्यथा मांडावी, अशी भूमिका मी घेतली. त्यास समर्थन मिळेलच, असे आमदार बकाने म्हणाले.