वर्धा : दिवाळी आता ऐन भरात येत आहे. खरेदीस उधाण आले आले आहे. प्रामुख्याने शहरी भागातील हे चित्र आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात आपापल्या परिस्थितीनुसार दिवाळी साजरी करण्याची तयारी सूरू असल्याचे दिसून येते. मात्र काही भाग असा की आनंदासाठी नव्हे तर दिवाळी साजरी करता येण्यासाठी दक्षता म्हणून जंगलात फटाके फुटत असल्याचे दिसून आले. समुद्रपूर तालुक्यातील खुरसापार पंचक्रोशीत एक वाघीण, तीचे तीन शावक व वाघीनीच्या मागावर वाघ असे महिन्याभरापासूनचे चित्र राहले.
एकाचवेळी पाच वाघाचे कुटुंब परिसरातील गावालागत फिरत असल्याने चांगलीच भिती पसरली. त्याचा बंदोबस्त करावा म्हणून चार गावातील नागरिकांनी निवेदन देत आंदोलन करण्याचा ईशारा पण देऊन टाकला. त्याची दखल घेण्यात आली. एका वाघास पकडण्याची परवानगी पण मिळाली. त्यासाठी १५ दिवसापासून प्रयत्न सूरू आहे.
मात्र यश आले नाही. भिती कायम. कारण जंगल क्षेत्र सीमित तर शेतीचे क्षेत्र मोठे. म्हणून वाघाचा वावर शेत शिवारात सुरूच आहे. त्यात आली दिवाळी. ती साजरी पण करायची. म्हणून वाघीण व तिची पिल्ले गावापासून दूर राहावी म्हणून फटाके फोडल्या जात आहे. गावठी बार उडविल्या जात आहे. या आवाजामुळे वाघ गावाच्या दिशेने भटकत नाही, असा खुलासा या भागात वाघ शोधार्थ फिरणारे पीपल्स फॉर ऍनिमल्स या स्वयंसेवी संघटनेचे कौस्तुभ गावंडे यांनी केला. आजच दिवाळीसाठी गिरडवरून वर्ध्यात आलो. या वाघ परिवाराची भटकंती टप्प्यात येत नसल्याचे ते सांगतात.
तर दुसरीकडे वन अधिकारी सांगतात की वाघ हा आता नागपूर बुटीबोरीच्या दिशेने गेल्याची ताजी घडामोड आहे. दोन दिवसांपूरवी त्याने कोडलापीरच्या दिशेने कूच केल्याचे दिसून आले. वाघीण आणि तीचे तीन बच्छडे मात्र गिरड परिसरातच आहेत. त्यामुळे गावाकऱ्यात भिती कायम आहे. त्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची असा अनेकांना पेच पडला आहे. त्यासाठी वन खात्याची विशेष चमू गस्त देत आहे. काही गावात नकली बंदुकीचे आवाज काढून वाघ गावाकडे फिरकणार नाही, याची काळजी गावकरी घेत आहे.
वाघीण भ्रमंती सूरू असल्याने अनेक दिवसापासून शेतीकामे ठप्प पडली आहेत. पाळीव पशुचा फडश्या पाडल्या जातोय. पिके कापणीस आली. पण भिती असल्याने उपाय नसल्याचे गावकरी म्हणतात. पण गावात व शिवारात फटाके मात्र धडाक्यात फुटत आहे. जंगलात केवळ वाघासाठी फटाके फोडावे लागत असल्याची ही आपत्ती ऐन दिवाळीत काही गावंवर आली.