वर्धा: कोणतेही शासकीय काम करण्यासाठी निविदा काढल्या जाते. त्यात अटी असतात. अटीच्या अधिन राहून कंत्राटदारास काम पूर्ण करावे लागते. पण दाखविलेल्या अटी बनावट कागदपत्रे सादर करीतपूर्ण करणे आणि कामे लाटणे, असा प्रकार केल्यास काय ? याचेच उत्तर आमदार राजेश बकाने यांनी विचारले आहे.ग्रामीण रस्त्यांचे काम फसवणूक करून मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला असून मे. नयन इंटरप्राईजेस, वर्धा यांनी खोटं प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशीत उघड झाले आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या लेखाशीर्ष अंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाकरिता २०२४ – २५ मध्ये निधी उपलब्ध झाला होता. संबंधित निविदांमध्ये “हॉट मिक्स प्लांट सुस्थितीत असणे बंधनकारक” अशी अट होती. या निविदेत मे. नयन इंटरप्राईजेस यांनी दयालनगर, बोरगाव मेघे येथील हॉट मिक्स प्लांट सुरू असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केले.मात्र ते बोगस असल्याची तक्रार आमदार राजेश बकाने यांनी केली. या तक्रारीनंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने चौकशी केली. चार अभियंत्यांच्या समितीने केलेल्या पाहणीत सदर प्लांट बंद, जंगलेली मशिनरी, गवत वाढलेली, विद्युत कनेक्शन तोडलेले अशा अवस्थेत आढळले. म्हणजेच नयन इंटरप्राईजेसने काम मिळवण्यासाठी प्रशासनाला खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले.

मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूर यांनी देखील २७ जानेवारीस दिलेले फिटनेस प्रमाणपत्र रद्द करत या फसवणुकीची नोंद केली आहे. या गंभीर प्रकारावर प्रतिक्रिया देताना आमदार राजेश बकाने म्हणाले की जिल्ह्यातील विकासकामे पारदर्शक, दर्जेदार आणि शेतकऱ्यांना उपयोगी ठरावीत, हीच आमची भूमिका आहे. पण खोट्या प्रमाणपत्रावर ठेके मिळवणाऱ्या ठेकेदारांना आम्ही अजिबात पाठीशी घालणार नाही. शासनाची फसवणूक करून जनतेचा पैसा लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या नयन इंटरप्राईजेसला तात्काळ ब्लॅक लिस्ट करण्यात यावे. अशा भ्रष्ट प्रवृत्तीविरुद्ध कठोर उदाहरण घालून दिलेच पाहिजे.

आमदार बकाने यांच्या या मागणीमुळे आता संबंधित ठेकेदाराविरुद्ध प्रशासन कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहे. मात्र हे रस्ते साध्या पावसात उखडून गेल्याच्या सातत्याने तक्रारी झाल्यात. त्रस्त गावाकऱ्यांनी रस्ते कामे योग्य व्हावीत म्हणून पाठपुरावा चालविला होता. पण आमदार बकाने यांनी पोल खोल करीत कामे कशी व कोणास दिल्या गेली, याचा पुरावाच सादर केल्याचे म्हटल्या जात आहे.