शंभरातील ४० जणांना विविध आजाराची शक्यता; मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचा अभ्यास

हल्लीच्या वाढत्या स्मार्ट फोनवरील (मोबाईल) व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरच्या वापराचा मानवाच्या झोपेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शंभरातील ४० जणांची सलग आठ तासांची अखंड झोप केवळ चार तासांवर आल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या श्वसनरोग विभागाच्या अभ्यासात पुढे आले आहे.

मोबाईलवर जास्त वेळ व्हॉट्?सअ‍ॅप, फेसबुक आणि ट्विटर हाताळल्यास मानवाच्या शरीरातील मास्टर हार्मोन असलेले मिलॅटोनियम हे रसायन कमी होते. यामुळे झोपेचे आजार होण्याची शक्यता बळावते. आगामी दशकात याचे परिणाम जास्त गंभीर होण्याची शक्यता आहे. बदलत्या जीवनशैलीने मानवाच्या झोपेवर अतिक्रमण केले. परिणामी, आजारांना निमंत्रण मिळाले. झोपेचे आजार ९० प्रकारचे आहेत. यात ४४ टक्के पुरुष आणि २८ टक्के स्त्रिया घोरण्याच्या आजाराने त्रस्त आहेत. यावर उपाय रात्री १० वाजता झोपी जाण्याचा आहे. साडेआठला जेवण करावे. दहा ते पंधरा मिनिटे शतपावली करावी आणि रात्री दहाला उशीवर डोके टेकवावे. आयुष्यातील ३३ टक्के वेळ झोपण्यात घालवतात, परंतु शहरीकरण,औद्योगिकीकरणासोबतच माहिती तंत्रज्ञानातून जन्माला आलेल्या सोशल नेटवर्किंगने चिमुकल्या पासून तर साठीतील ज्येष्ठांचीही झोप उडाली. झोपेत फिट येण्यापासून तर मेंदू झोपेत जागा राहण्याचे आजार होतात. झोपेच्या विकारावर हमखास उपाय आहेत, असे स्लिप मेडिसीन विषयात ‘जॉन्स हॉपकिन्स मेडिकल युनिव्हर्सिटी’तून पदवी पूर्ण करणारे मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले.

सुखाच्या झोपेचे चार चक्र

झोपेत व्यक्तीचा मेंदू चार प्रकारच्या स्थितीमधून प्रवास करतो. चारही झोपेच्या स्थितीमध्ये डोळ्यांची हालचाल न होता घेतली जाणारी झोप ही ७० मिनिटांची असते. याला ‘नॉन रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप’ असे संबोधले जाते. डोळ्यांच्या हालचालींसोबत होणारी झोप २० मिनिटांची असते. अशाप्रकारे झोपेचे एक चक्र सुमारे ९० मिनिटांचे असते. असे चार चक्र असतात. या चक्रांची दिशा योग्य असली तर झोपेनंतर मनुष्य शांत असतो. चिडचिड होत नाही. झोपेतील चक्रात वारंवार बदल आले की, बॉयोलॉजिकल क्?लॉक (झोपेची घडी) बिघडते आणि आजाराला निमंत्रण मिळते.

अपुऱ्या झोपेमुळे होणारे आजार

  • झोपेत श्वास थांबणे
  • झोपेत फिट येणे
  • काही काळासाठी स्मृतिभ्रंश
  • विसरभोळेपणा
  • दिवसा थकल्यासारखे वाटणे
  • झोपेतून उठताना थकवा जाणवणे
  • झोपेत लघवी करणे

मुलांसाठी घोरणे घातक

लहान मुलांसाठी घोरणे घातक आहे. चिमुकल्या बाळासाठी १६ ते १८ तास झोप असावी. दोन ते १० वयोगटातील लहान मुलांना सुमारे १० ते १२ तास झोप आवश्?यक असते. शैक्षणिक स्पर्धेने या चिमुकल्यांचीही झोप उडवली. यात पालकांचा मोठा वाटा आहे. १० ते २० वयोगटातील मुलांसाठी आठ ते १० तास झोप बरी आहे.

डॉ. सुशांत मेश्राम, प्राध्यापक व विभाग प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.