नागपूर : महाल परिसरात झालेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानच्या नातेवाईकांची दुकाने तहसील पोलिसांनी सील केली. पोलिसांच्या या कारवाईला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. पोलिसांना नोटीस बजावत कोणत्या अधिकाराच्या अंतर्गत दुकाने सील करण्यात आली, याबाबत जबाब नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

याचिकाकर्ता शाहीन मोहमद हामिद आणि जीनत अशरफ यांचे मोमिनपुरा परिसरात हैदरी कॉम्प्लेक्समध्ये दुकाने आहेत. १७ मार्च रोजी झालेल्या नागपूर हिंसाचारानंतर २२ मार्च रोजी ही दुकाने सील करण्याची महापालिका उपायुक्तांनी विनंती केली. हिंसाचारातील आरोपी असलेले मायनोरिटी डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष फहीम खान यांची पत्नी आणि नातेवाईकांची ही दोन दुकाने आहेत. संबंधित दुकानातून हिंसाचाराचा कट रचला गेला, असा आरोप करत महापालिकेने पोलिसांना तपास करण्याची विनंती केली. यानंतर तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी ही दुकाने सील केली. याचिकाकर्त्यांनी या बाबीला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

हिंसाचारातील आरोपी असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. दुकानांचा बेकायदेशीर गोष्टींसाठी वापर होत असल्याचा आरोप निराधार आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने हिंसाचारातील आरोपींबाबत तयार केलेल्या नियमावलीचे हे उल्लंघन आहे, त्यामुळे पोलिसांची ही कारवाई बेकायदेशीर ठरवून दुकानांची सील काढण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी तहसील पोलिसांना नोटीस बजावत कोणत्या अधिकाराच्या अंतर्गत दुकाने सील करण्यात आली आहे याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी न्यायालयाच्या उन्हाळी अवकाशानंतर निश्चित करण्यात आली.

मुख्य आरोपी फहीमला जामीन मिळणार?

हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांकडून गुरुवारी युक्तिवाद पूर्ण झाला. सत्र न्यायालय याप्रकरणात शुक्रवारी निर्णय सुनावणार आहे. महाल परिसरात १७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर १८ मार्च रोजी पोलिसांनी फहीम खानला अटक केली होती. तेव्हापासून फहीम खान पोलिसांच्या ताब्यात आहे. मार्चच्या अंतिम आठवड्यात फहीम खानने जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, विविध कारणांंमुळे जामिनावर सुनावणी पुढे ढकलण्यात आली. मंगळवारी याप्रकरणी दुसरा आरोपी हामिद इंजिनियर याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सुमारे एक महिना पोलिसांच्या ताब्यात राहिल्यावर हामिदाला जामीन मिळाला होता. आता हामिदप्रमाणे फहीम खानला जामीन मिळतो की नाही, हे बघणे महत्वपूर्ण ठरेल.