लोकसत्‍ता टीम

अमरावती : गेल्‍या एक वर्षांपासून पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपीने एका १८ वर्षीय युवतीच्‍या गळ्यावर चाकूने वार केला. ही थरारक घटना बुधवारी सकाळी येथील राजापेठ परिसरातील रेल्‍वे भुयारी मार्गावर घडली. या घटनेनंतर नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले. युवतीवर येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सध्‍या धोक्‍याबाहेर आहे.

प्रफुल्‍ल मुकूंद काळकर (२३, रा. राजापेठ) असे आरोपीचे नाव आहे. राजापेठ परिसरातच राहणारी १८ वर्षीय युवती बुधवारी सकाळी महाविद्यालयात जात असताना पाठलाग करीत आलेल्‍या आरोपी प्रफुल्‍ल याने तिला थांबवून गळ्यावर वार केला. युवतीने आरडाओरड केल्‍यानंतर परिसरातील नागरिक, ऑटोरिक्षा चालक तिच्‍या दिशेने मदतीसाठी धावले, त्यामुळे आरोपीने तेथून पळून जाण्‍याचा प्रयत्‍न केला. पण, नागरिकांनी आरोपीला पकडले आणि चांगलाच चोप दिला. नंतर आरोपीला राजापेठ पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले. पोलिसांनी आरोपीच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करून त्‍याला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

आणखी वाचा-नग्नावस्थेत रस्त्यावर फिरणाऱ्या तरुण-तरुणीच्या प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’; व्हिडिओ काढणाऱ्याविरोधात गुन्हा

आरोपी सतत पीडित युवतीचा पाठलाग करीत होता. तिला रस्‍त्‍यात अडवून धमकी देत होता. आरोपीने तरूणीला जीवे मारण्‍याची आणि अॅसिड हल्‍ला करण्‍याची धमकी देखील दिली होती. आरोपी प्रफुल्‍ल हा गेल्‍या वर्षभरापासून या युवतीला एकतर्फी प्रेमातून त्रास देत असून गेल्‍या मार्च महिन्‍यात युवतीच्‍या पालकांनी आरोपीच्‍या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली होती. तेव्‍हा पोलिसांनी आरोपीला अटकही केली होती. पण, जामीन मिळाल्‍यानंतर पुन्‍हा आरोपीने युवतीचा पाठलाग आणि त्रास देण्‍यास सुरूवात केली, असा आरोप युवतीच्‍या कुटुंबीयांनी केला आहे.

आरोपीच्‍या त्रासाला कंटाळून युवतीच्‍या पालकांनी घराजवळील एका महाविद्यालयात तिच्‍या शिक्षणाची व्‍यवस्‍था केली. बुधवारी ती मैत्रिणीसमवेत महाविद्यालयात पायी जात असताना अचानकपणे मागून आलेल्‍या आरोपीने तिच्‍यावर हल्‍ला केला. युवतीला येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. तिच्‍या गळ्याला सहा टाके पडले आहेत. या घटनेत सुदैवाने तिचा जीव वाचला आहे. परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी वेळीच धाव घेतल्‍याने अनर्थ टळल्‍याची चर्चा परिसरात सुरू होती.

आणखी वाचा-गोंदिया जिल्हयात वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू, १३०६ घरांची पडझड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरावती शहरात यापुर्वीही एकतर्फी प्रेमातून युवतींवर प्राणघातक हल्‍ल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. अनेक तरूणींना त्‍यात प्राण गमवावे लागले आहेत. पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित युवतीच्‍या नातेवाईकांनी केली आहे.