लोकसत्ता टीम

नागपूर : पुरुषांना लग्नासाठी बाध्य करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका महिलेचा उलगडा झाला आहे. संबंधित महिलेने ‘हनी ट्रॅप’ करत छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत एका ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याशी जबरदस्तीने लग्न करत १७ लाख उकळण्यात आले. तिचे हे आठवे लग्न होते. पोलिसांनी या प्रकरणात महिलेसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

गुलाम असे तक्रारदाराचे नाव असून त्यांचे लग्न झाले आहे. त्यांनी फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर समीरा नावाच्या महिलेचा त्यांना सप्टेंबर २०२२ मध्ये फोन आला होता. तिने स्वत: घटस्फोटित असल्याचा दावा करत त्यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिने त्यांना भेटायला बोलावले व मानसरला नेले. तेथे दोघे एका हॉटेलमध्ये गेले व शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान समीराने आक्षेपार्ह छायाचित्रे काढली. यानंतर तिने गुलामशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. गुलाम विवाहित असल्याने व मुले असल्याने त्यांनी लग्नास नकार दिला. ११ डिसेंबर २०२२ रोजी समीरा तिच्या कुटुंबातील आठ-दहा सदस्यांसह गुलामच्या घरी आली. आक्षेपार्ह फोटो सासरच्या मंडळींना दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली. त्याच वेळी त्यांनी तक्रारदाराला समीराशी लग्न करण्यास लावले. गुलामने समीरा आणि तिच्या मुलाला बोखारा येथील घरात राहण्यास सांगितले. यानंतर समीरा आणि तिच्या कुटुंबीयांनी गुलामला धमकावून मालमत्ता आणि खर्चासाठी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. गुलामने तिला पाच लाख रुपये दिले.

आणखी वाचा- “डाव्या विचारवंतांपासून देशाला वाचवावे लागेल, अन्यथा हे लोक…” संघाचे अखिल भारतीय सदस्य सुरेश सोनी यांचा इशारा

२३ डिसेंबर २०२२ रोजी समीराला पाचपावली पोलीस ठाण्यातून फोन आल्याने गुलामला संशय आला. त्यांनी तेथे जाऊन चौकशी केली असता समीराने २३ ऑक्टोबर २०२२ रोजी अमानुल्ला नावाच्या व्यक्तीशी लग्न केले असल्याची बाब समोर आली. ती घटस्फोटित नसतानादेखील तिने खोटा दावा केला होता. तिने सात लग्न केल्याचे व दोन पतींनी तिच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींवरून जरीपटका आणि मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाल्याची बाब समोर आली. समीराने सर्व पतींना खोट्या प्रकरणात अडकवून पैसे उकळले होते. घरी आल्यानंतर चौकशी केली असता समीरा आणि तिच्या कुटुंबीयांनी कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देत ५ लाख रुपये घेतले. यानंतर समीराने स्वत:ला गर्भवती असल्याचे घोषित केले आणि गुलामला मुलाचे वडील म्हणू लागली.

त्यांनी गुलाम यांना यादव हॉस्पिटलमध्ये आणि डॉ.वसीम शेख यांना नेले. डॉ. शेख यांनीही गुलामला घाबरवले आणि आई आणि बाळाला काही झाले तर तेच त्याला जबाबदार असतील असे सांगितले. बनावट सोनोग्राफी अहवाल दाखवून गुलाम यांच्याकडून सात लाख रुपये घेतले. गुलाम यांचे बनावट विवाह प्रमाणपत्र दाखवत त्यांनी अर्धी संपत्ती समीराच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. अखेर निराश होऊन गुलाम यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी समीरा, तिची आई रेहाना, काका मौसीन, मौसीनची पत्नी, ड्रायव्हर हरीश, मित्र वसीम, डॉ. वसीम शेख आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, धमकावणे आणि बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.