लोकसत्ता टीम

नागपूर : शहरात महिला सुरक्षेला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे उपराजधानी नेहमी चर्चेत असते. शनिवारी एका तरुणीशी भरचौकात अश्लील चाळे तर एका महिलेच्या घरात घुसून महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी सक्करदरा आणि जरीपटका पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली.

महाविद्यालयातून घरी जात असलेल्या विद्यार्थिनीचा एका टवाळखोर तरुणाने भररस्त्यात विनयभंग केला. ही घटना तहसील पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपी तरुणाला अटक केली. जितेंद्र राजेश शाहू (२१) रा. वनदेवीनगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी मैत्रिणीसह महाविद्यालयातून घरी जात होती. दरम्यान जितेंद्रने तिचा पाठलाग केला. संधी मिळताच तिचा रस्ता अडवला. तिच्याशी अश्लील चाळे करीत विनयभंग केला. यामुळे तरुणी घाबरली. ती रडत-रडत घरी पोहोचली. कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. आईने तिला सोबत घेऊन सक्करदरा पोलिस स्टेशन गाठले आणि जितेंद्र विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून जितेंद्रला अटक केली.

आणखी वाचा-नागपूर : एअर होस्टेस प्रशिक्षणार्थीचे प्रियकरासोबत पलायन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या घटनेत, एका व्यक्तीने परिसरातील महिलेच्या घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे केले. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी ३७ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. एन्थोनी शंकर टेंभेकर (४२) रा. सुगतनगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शनिवारी रात्री पीडित महिला घराचे दार लेटून झोपलेली होती. रात्री १.१५ वाजताच्या सुमारास आरोपी एन्थोनी दार उघडून महिलेच्या घरात घुसला. झोपेत असल्याचा फायदा घेऊन महिलेशी अश्लील चाळे सुरू केले. यामुळे महिलेची झोप उघडली. तिने एन्थोनीला चांगलेच फटकारले. यामुळे संतापलेल्या एन्थोनीने महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन शांत राहण्यास सांगितले. घाबरलेल्या महिलेने घरातून बाहेर पळ काढला. मदतीसाठी आरडा-ओरड केली असता परिसरातील लोक जागे झाले. एन्थोनीने तेथून पळ काढला. महिलेने घटनेची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून एन्थोनीला अटक केली.