लोकसत्ता टीम

भंडारा : तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील औषध निर्मिती करणाऱ्या क्लेरियन कंपनीत २२ जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या रासायनिक अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुपरवायझरचा उपचारादरम्यान शनिवारी दुपारी मृत्यू झाला. यामुळे कामगारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून कामगारांनी आंदोलन सुरू कलेले आहे. परिणामतः दोन दिवसांपासून कारखान्याचे उत्पादन ठप्प आहे.

मृताचे नाव सुनील दमाहे (३२, रा. देव्हाडी) असे आहे. सदर कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने उपलब्ध करून दिले असते तर हा अपघात टळला असता. परंतु, कंपनीने सुरक्षा साधने व सुविधा दिले नसल्याने अपघात नेहमीच होत असल्याचे कामगारांनी निवेदनात सांगितले आहे.

संप पुकारलेल्या कर्मचारी व कामगारांचे मागण्या

कारखान्यात सुरक्षा साधने उपलब्ध करावे, अपघात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करावे, कारखान्या परिसरात उपहारगृह उपलब्ध करून सुविधा द्या, पगारासह ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ कामकेल्याचा मेहनताना द्यावा, कामगाराला वेतन १५०००/- देण्यात यावे, नियमित स्थायी कामगारांचे वेतन ३००००/- असावे, सर्वाना बोनस समान पध्दतीने एकत्र दिला जावा अश्या मागण्या घेऊन कारखान्यासमोर आंदोलन सुरू केले आहे. याबाबत क्लेरीयन ड्रग्स कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक तिवारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे तसेच यासंदर्भात जिल्हाधिकारी भंडारा, तहसीलदार तुमसर आणि ठाणेदार तुमसर यांना निवेदन केले असल्याचे कामगारांनी सांगितले.

क्लेरियन कारखान्यात सुरक्षा साधने व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही त्यामुळे कंपनीत कर्मचाऱ्यांच्या अपघातात मृत्यू झाला भविष्यात अश्या दुर्घटना होऊ नये तसेच कामगारांना नियमाप्रमाणे वेतनवाढ करावी या मागण्यांसाठी संप पुकारले आहे. -अशोक बघेले, कर्मचारी, क्लेरियन कारखाना देव्हाडी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारखान्यातील कर्मचारी व कामगारांनी पुकारलेला संप पूर्णपणे चुकीच्या आहे नियमानुसार कंपनी व्यवस्थापकांना व कामगार आयुक्तांना सदर मागण्यांसाठी निवेदन देऊन काही वेळ द्यायला पाहिजे होते. -त्रिजोगी सिंग, सहाय्यक व्यवस्थापक, क्लेरियन कारखाना देव्हाडी.