यवतमाळ : भक्तीचे नवरंग उधळ नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. या काळात असंख्य भक्त भक्तिभावाने दुर्गादेवीची उपासना करताना. उपवास हा नवरात्रोत्सवातील उपासनेचा महत्वाचा भाग आहे. मुख्य भोजन न करता केवळ फळ, दूध, साबुदाणा, भगर या पदार्थांना प्राधान्य दिले जाते. मात्र उपवासाचे पावित्र्य टिकवण्यासाठी तुम्ही भगर खात असाल तर वेळीच सावध व्हा. खुद्द यवतमाळ जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पत्रक काढून, भाविकांना भगर खाण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
नवरात्रीच्या या नऊ दिवसांत भाविक उपवास करतात. या दरम्यान मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याच्या अनेक घटनांची नोंद यापूर्वी अनेक जिल्ह्यात झाली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये, यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनानेही भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. सध्या पाऊस सुरू आहे. पावसाळ्यातील वातावरण बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते.भगरीवर मोठ्या प्रमाणात ‘अस्परबिलस’ प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे ‘फ्युमिगाक्लेवीन’ यासारखी विषद्र्व्ये तयार होतात.
बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास विषबाधा होऊ शकते, असे प्रशासनाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा, शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. नामांकित आणि लेबल असलेलीच भगर खरेदी करा. सुटी भगर खरेदी करण्याचे टाळा. भगर घेताना पाकीटवरील उत्पादन तारीख आणि अंतिम वापर हे तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी झाकणबंद डब्यात ठेवा, असे सांगितले आहे.
भगर पीठही घातक
भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीतील पिठात वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही, याची दक्षता घ्या. भगरीच्या पिठात वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी. भगरीचे पीठ घरीच दळून घ्यावे. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहे. दोन ते तीन दिवस सलग उपवास असताना या पदार्थाचे सेवन ॲसिडिटी वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. त्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विक्रेत्यांना सूचना आणि कारवाईचा इशारा
बाजारातील विक्रेत्यांनी पाकीटबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करताना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. भगर पाकिटावर उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक आणि पॅँकिंग व अंतिम वापर तारखेचा उल्लेख आहे की, नाही याची खात्री करावी. मुदतबाह्म भगर किंवा पिठाची विक्री करू नये. सुटी भगर व खुले भगर पीठ शक्यतो विक्रीसाठी ठेवू नये, अशा सूचना विक्रेत्यांना प्रशासनाने दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.