दिल्लीतील ‘जेएनयू’ विद्यापीठातील घडामोडींच्या अनुषंगाने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शिवजयंतीचे औचित्य साधत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपविरुद्ध तोफ डागत भाजप नेत्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन करण्याचा प्रयत्न केला.
शहर व जिल्हा काँग्रेसने शिव जयंतीचे औचित्य साधत महात्मा गांधी रस्त्यावरील पक्ष कार्यालयासमोर हे आंदोलन केले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडलेल्या घटनेबाबत काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावरून भाजपचे नेते व योगगुरू रामदेव बाबा आदींनी राहुल गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केली. भाजप नेते व रामदेव बाबा यांच्या विधानांचा काँग्रेसच्या आंदोलकांनी निषेध केला. भाजप सरकारने इंग्रजांप्रमाणे दडपशाहीचे धोरण अवलंबले आहे. भाजप देशात जाती व धर्मात भांडण लावून अराजकता निर्माण करत असल्याचा आरोप शरद आहेर यांनी केला. भाजपची ही कृती देशाच्या सुरक्षिततेला व अखंडतेला धोका पोहचविणारी असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. या वेळी भाजप नेते व रामदेव बाबा यांच्या प्रतीकात्मक पुतळण्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनात माजी मंत्री शोभा बच्छाव, हेमलता पाटील, सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर, महिला अध्यक्षा वत्सला खैरे, नगरसेवक लक्ष्मण जायभावे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.