वाहनधारकांना दोन वेळा टोलचा भुर्दंड

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर घोटी नाक्यावर टोल भरल्यास पडघा नाक्यावर टोल आकारला जात नव्हता. पिंपळगाव बसवंत नाक्यावर परतीच्या प्रवासासह टोलची रक्कम एकदा भरल्यास कमी रक्कम लागायची. फास्टॅग यंत्रणेतील त्रुटीमुळे आता घोटीसह पडघा नाक्यावरही टोल आकारला जात आहे. पिंपळगाव बसवंत टोल परतीच्या प्रवासात वाहनधारकांना जादा रक्कम मोजावी लागत आहे. या घटनाक्रमाने तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय फास्टॅगच्या वापरास विरोध होऊ लागला आहे.

त्रुटी दूर केल्यानंतर नाशिकमधील टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे केली आहे. नववर्षांत राष्ट्रीय महामार्गावरील नाक्यांवर टोल भरताना वाहनांवर फास्टॅग असणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु, फास्टॅगबाबत अनेक तांत्रिक अडचणी असून त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला विनाकारण झळ बसत आहे. घोटी नाक्यावर वाहनधारकांनी टोल भरल्यास पडघा  नाक्यावर टोल आकारण्यात येत नव्हता. तसेच पिंपळगाव बसवंत नाक्यावर परतीच्या प्रवासासह टोल एकदा भरल्यास टोलची रक्कम कमी आकारली जात होती. पुन्हा परतीला टोल आकारण्यात येत नव्हता. परंतु, घोटी नाक्यावर फास्टॅगद्वारे टोल आकारला गेल्यास पडघा नाक्यावर फास्टॅगच्या तांत्रिक त्रुटींमुळे पुन्हा टोल आकारला जात आहे. तसेच पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर परतीच्या प्रवासावेळी वाहनधारकांना जास्तीची रक्कम मोजावी लागत आहे. याकरिता फास्टॅगमधील तांत्रिक त्रुटी दूर केल्यावरच त्याचा वापर नाशिकमधील टोल नाक्यावर अनिवार्य करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन प्रकल्प संचालकांना देण्यात आले. याप्रसंगी जय कोतवाल, बाळा निगळ, नीलेश भंदुरे, सागर बेदरकर, संतोष जगताप, राहुल कमानकर, संदीप गांगुर्डे, दीपक पाटील आदी उपस्थित होते.