पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील प्रमुख व्यापारी पेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात ७ ते ११ एप्रिल या कालावधीत पाच दिवस जनता संचारबंदी करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस, महसूल विभाग आणि व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.

शहर आणि परिसराला करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून दररोज शेकडो रुग्ण वाढत आहेत. करोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मागील आठवडय़ातच आठ ते १० नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनासह सर्वच धास्तावले आहेत. या पाश्र्वभूमीवर पोलीस, ग्रामपंचायत, महसूल विभाग, व्यापारी यांची संयुक्त बैठक येथील मुख्य जलकुंभ आवारात झाली. विश्वासराव मोरे, उपसरपंच सुहास मोरे, माजी उपसरपंच संजय मोरे, गणेश बनकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे,  मंडल अधिकारी नीलकंठ उगले, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदी उपस्थित होते. उपस्थितांनी करोनाच्या वाढत असलेल्या संसर्गाविषयी चिंता व्यक्त केली.

करोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी बुधवारपासून पाच दिवस जनता संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या कालावधीत वैद्यकीय आणि जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला व्यापाऱ्यांनीही संमती दिली आहे. शहरातील करोना केंद्र, खासगी रुग्णालय पूर्ण क्षमतेने भरले असून नवीन रुग्णांसाठी खाट मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे प्राण वाचविणे हे प्रथमकर्तव्य समजून संचारबंदीचा निर्णय घेण्यात येत असल्याचे गणेश बनकर यांनी सांगितले. बैठकीत अल्पेश पारख, बापूसाहेब कडाळे, शीतल धाडीवाल, प्रवीण वाळेकर, अनिल खाबिया आदी उपस्थित होते.

पिंपळगाव बसवंत शहरात जनता संचारबंदी लावण्याचा विचार नव्हता; परंतु परिस्थिती खूप गंभीर झाली आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. व्यापार, व्यवसायापेक्षा नागरिकांचा जीव महत्त्वाचा असून त्यासाठी हा निर्णय व्यापाऱ्यांच्या संमतीने घेतला आहे. यासाठी सर्वानी सहकार्य करावे.

– गणेश बनकर (ग्रामपंचायत सदस्य, पिंपळगाव बसवंत)